Benjamin Netanyahu: “जोपर्यंत मी पंतप्रधान आहे…” ; नेतान्याहू यांचे डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान, शांतता करारदेखील फेटाळला
Benjamin Netanyahu: जवळपास चार महिन्यांच्या संघर्षानंतर आणि दीर्घकाळ चाललेल्या वाटाघाटींनंतर अमेरिका आणि इराणने शांतता कराराची घोषणा केली.

Benjamin Netanyahu: जवळपास चार महिन्यांच्या संघर्षानंतर आणि दीर्घकाळ चाललेल्या वाटाघाटींनंतर अमेरिका आणि इराणने शांतता कराराची घोषणा केली. मात्र, अमेरिकेच्या इराण करारामुळे इस्रायल तीव्र नाराज असल्याचे दिसते. इस्रायलने, “ते दक्षिण लेबनॉनमधून माघार घेणार नाही” असे स्प्ष्टपणे सांगत अमेरिकेला एक प्रकारे आव्हान दिल्याचे म्हटले जात आहे.
या मुद्द्यामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यातील नवीन मतभेदही समोर आले आहेत. नेतान्याहू यांनी ट्रम्प यांच्याशी असलेले आपले मतभेद उघडपणे व्यक्त करत, “कधीकधी त्यांची मते जुळत नाहीत” असा मोठा खुलासा देखील केला आहे.
ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यात मतभेद ? (Benjamin Netanyahu)
इराण युद्धादरम्यान या दोघांमधील मतभेद सार्वजनिकरित्या दिसून आले होते, विशेषतः जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तेहरानसोबत शांतता करार करण्याचा प्रयत्न करत होते आणि इस्रायलच्या लेबनॉनवरील सततच्या आक्रमकतेमुळे त्यात अडथळा येत होता.
ट्रम्प यांच्यासोबतच्या आपल्या संबंधांविषयी नेतान्याहू म्हणाले, “अमेरिकेतील लोक म्हणतात की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प मी जे काही सांगतो ते सर्व ऐकतात, आणि आमच्या देशात लोक याच्या उलट म्हणतात, की मी ते जे काही सांगतात ते सर्व ऐकतो. हे अजिबात खरे नाही.”
लेबनॉनबद्दल नेतान्याहू काय म्हणाले?
नेतान्याहू यांनी स्पष्टपणे, “इस्रायल लेबनॉनमधील ताब्यात घेतलेल्या भूभागातून माघार घेणार नाही, ज्याठिकाणी इस्रायल इराण-समर्थित हिजबुल्लाहशी लढत आहे.” असे सांगितले आहे. नेतान्याहू पुढे म्हणाले, “आम्ही एक बफर झोन तयार केला आहे आणि जोपर्यंत गरज असेल तोपर्यंत आम्ही तिथेच राहू.”
इस्रायली संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी याविषयी बोलताना, अमेरिका आणि इराण यांच्यात जाहीर झालेल्या युद्धविरामानंतर इस्रायल दक्षिण लेबनॉनमधून माघार घेणार नाही, ज्यामध्ये हिजबुल्लाहविरुद्धची लढाई थांबवण्याचाही समावेश आहे.’ असे म्हटले आहे. काट्झ यांनी एका निवेदनात म्हटले, “पंतप्रधान नेतान्याहू आणि मी एका स्पष्ट धोरणाचा पाठपुरावा करत आहोत, ज्यानुसार इस्रायली संरक्षण दल (IDF) कोणत्याही वेळेच्या मर्यादेशिवाय लेबनॉन, सीरिया आणि गाझाच्या सुरक्षा क्षेत्रांमध्ये राहील, जेणेकरून जिहादी घटकांपासून सीमेचे आणि इस्रायली वस्त्यांचे संरक्षण करता येईल.”
इराण शांतता कराराबद्दल नेतान्याहू काय म्हणाले? (Benjamin Netanyahu)
इराणसोबतच्या अमेरिकेच्या शांतता कराराबाबत, इस्रायलचे पंतप्रधान म्हणाले की, “करार होवो वा न होवो, इराणकडे अण्वस्त्रे नसतील. आजही नाही, उद्याही नाही. जोपर्यंत मी इस्रायलचा पंतप्रधान आहे, तोपर्यंत हे घडणार नाही.” असे त्यांनी म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केलेल्या शांतता कराराला फेटाळून लावले.
ते पुढे म्हणाले की, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविराम करार हा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा निर्णय आहे आणि इस्रायलला अण्वस्त्रांचा धोका निर्माण होऊ नये, हे सुनिश्चित करण्यासाठी ते तिथे आहेत. इस्रायलने अमेरिकेसोबत मिळून २८ फेब्रुवारीला युद्ध सुरू केले, पण ते कराराचा भाग नाही.’ असे नेतान्याहू यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.






