Udayanraje Bhosale : खा. उदयनराजेंचा छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकाला फोन; म्हणाले,…अशी कुठलीही गोष्ट खपवून..

साताराः छावा या चित्रपटाचा ट्रेलर आल्यानंतर एका दृश्यावर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी नुकतीच या चित्रपटाच्या ट्रेलरमधील संबंधित दृश्यावर आक्षेप घेत ते हटवण्याची सूचना केली होती. यातच आता खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील छावा चित्रपटातील आक्षेपार्ह बाबी काढून त्यानंतर चित्रपट प्रदर्शित करावा असे सांगितले आहे. याबाबत चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांच्यासोबत उदयनराजे यांनी फोनद्वारे चर्चा केली आणि संबंधित दृष्य हटवण्याच्या सूचना केल्या आहेत. उत्तेकर यांनी देखील काही सूचना असतील, तर त्यात बदल करून हा चित्रपट लवकरात लवकर प्रदर्शित केला जाईल, असे सांगितले आहे.
धर्मरक्षक, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट बनवणे ही आनंदाची गोष्ट आहे. छत्रपतींचा इतिहास जगाला समजावा यासाठी असे प्रयत्न आवश्यक आहेत. या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्ये असल्याबाबत मते व्यक्त केली जात आहेत. यामुळे हा चित्रपट तज्ज्ञ आणि इतिहास जाणकारांना आधी दाखविण्यात यावा, त्याशिवाय प्रदर्शित करू नये, अशा सूचना केल्या आहेत. तसेच महाराजांच्या सन्मानाला बाधा पोहचेल, अशी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नसल्याचे देखील उदयनराजे म्हणाले.
…म्हणून होतोय विरोध
येत्या १४ फेब्रुवारीला अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांची मुख्य भूमिका असलेल्या छावा हा चित्रपट देशभरात रिलीज होणार आहे. २२ जानेवारीला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या सोबत रश्मिका मंदान्ना डान्स सीन बाबात आक्षेप नोंदविण्यात येत आहे. यासाठी मराठा क्रांती मोर्चाने या दृश्याला विरोध दर्शवला आहे. पुण्यातील लाल महाल येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. हा चित्रपट रिलीज झाल्यास त्याला विरोध दर्शविला जाईल असा इशारा देण्यात आला आहे.





