ब्रेकनंतर पुन्हा राज्यात पावसाची एन्ट्री; ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Weather | राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र ब्रेकनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरूवात झाली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यात आजपासून पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
आज १३ सप्टेंबरपासून महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळेल. त्यामुळे मुंबई, रायगड, रत्नागिरीसह ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेले काही दिवस पावसाने उघडीप दिल्याने तापमानात वाढ झाली होती. त्यामुळे उन्हाचा तडाखा सहन करावा लागत होते.
परंतु गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने नवी मुंबई परिसरातील पनवेल, खारघर, बेलापूरसह ठाणे शहर आणि परिसरात हजेरी लावली. त्यामुळे पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्यातच आता पुढील दोन-तीन दिवस राज्यात पावसाळी वातावरण राहणार आहे. Maharashtra Weather |
कोणत्या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा?
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजनुसार, रविवारी मुंबईसह ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर घाट परिसर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, जालना या जिल्ह्यात शनिवारपासून पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. Maharashtra Weather |
हेही वाचा:





