“आधी लोक भारतीय म्हणवून घेण्यास कचरत होते, मात्र आता…”; CM योगी नेमकं काय म्हणाले? पाहा….

Yogi Adityanath – भारतात नवीन नेतृत्वाच्या उदय झाल्यामुळे जग आता नवीन भारताबद्दल बोलू लागले आहे. हे वास्तव फक्त एक दशकापूर्वीचे आहे. जेव्हा भारतासह उत्तर प्रदेशातील लोक जगात कुठेही जायचे, तेव्हा त्यांना स्वतःला भारतीय म्हणवून घेण्यास लाज वाटत असे. पण आता ते अभिमानाने स्वतःला भारतीय म्हणवतात. कारण जगात भारताबद्दलचा आदर वाढला आहे, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.
शुक्रवारी अयोध्येतील राजसदन येथे दोन दिवसांचा साहित्य महोत्सव ‘टाइमलेस अयोध्या’चे उद्घाटन केल्यानंतर योगी कार्यक्रमात बोलत होते. योगी म्हणाले की, एकदा मी युरोपला गेलो होतो आणि तिथे सहलीसाठी बाहेर पडलो आणि टॅक्सी घेतली. मला वाटलं की टॅक्सी ड्रायव्हर भारतीय असावा. मी त्याला विचारले की, तो कुठून आहे आणि त्याने सांगितले की, तो पंजाबचा आहे.
मग त्याने मला सांगितले की, आम्ही भारतातून आलो आहोत, त्यामुळे आम्हाला इथे सुरक्षित वाटते. ही भारताची ताकद आहे. एक भारतीय असणे आणि त्याचा अभिमान मिरवणे ही या जगातली एक सर्वात आशादायक गोष्ट असते. त्याचा अभिमान बाळगणे ही प्रत्येक भारतीय नागरिकासाठी मोठी जबाबदारी असते.
येथून मुख्यमंत्री योगी रामकथा पार्कला पोहोचले आणि मुख्यमंत्री उद्योजक विकास अभियानांतर्गत आयोजित स्टार्टअप प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी त्यांनी तरुणांना ४७ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले. मुख्यमंत्री योगी यांनी महाराजा पॅलेस राज सदन येथे दोन दिवसांच्या साहित्य महोत्सव टाइमलेस अयोध्याचे उद्घाटन केले.
त्यांनी राजभवनातील अशोक वृक्षाला जल अर्पण करून टाईमलेस अयोध्या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी प्रभारी मंत्री सूर्य प्रताप शाही, प्रसिद्ध लोक गायिका मालिनी अवस्थी, संगीत अभ्यासक यतिंद्र मिश्रा हे देखील येथे उपस्थित होते.





