Satara : पसरणीच्या घाटातील मंदिरात दत्त जयंतीचा उत्साह

महाबळेश्वर : पसरणी घाटातील श्री दत्त मंदिरात दत्त जयंती उत्सवानिमित्त दि. १४ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी श्री दत्त उत्सव समितीकडून तयारी सुरु झाली आहे. वाईहून पाचगणी महाबळेश्वरकडे जाण्यासाठी पसरणी घाटातून प्रवास करावा लागतो.
या प्रवासासाठी एस. टी. महामंडळासह वाईहून खासगी जीप चालक वर्षानुवर्षे प्रवाशांच्या सेवेला हजर असतात. पसरणी घाटातून प्रवास करत असताना निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत जाताना अशाच एका वळणावर औंदुबराच्या वृक्ष चालक रोज पाहतात. शेजारी खळखळत्या पाण्याचा स्वच्छ झरा आकर्षित करत असतो. अचानक या ठिकाणी कुणीतरी औंदुबराच्या वृक्षाखाली श्री दत्त गुरुंचा फोटो ठेवल्याने येथे हळूहळू भाविक थांबून दर्शन घेत येथील झऱ्याचे स्वच्छ पाणी पिऊन विश्रांती घेऊ लागले. प्रवासादरम्यान एक वेगळीच शांती अनुभवयास मिळू लागली.
त्यामुळे वाई- पाचगणी- महाबळेश्वर जीप संघटनेने हळूहळू लक्ष देऊन तो परिसर साफसफाई करु लागले. त्यानंतर येथे छोटे मंदिर उभे करण्यात आले व झऱ्याच्या पाण्याच्या ठिकाणी कोरीव गोमुख बसविण्यात आले. बघता बघता मंदिर व संपूर्ण परिसराचा भाविकांच्या मदतीने व आर्थिक हातभारामुळे कायापालट जाला. येथे बसण्यासाठी सभामंडप, पावसापासून संरक्षणासाठी पत्र्याचे छप्पर उभे राहिले. येथे श्री दत्त जयंतीचा उत्सव ११ वर्षांपूर्वी सुरू झाला. भाविक स्वेच्छेने आर्थिक मदत करु लागले. बघता बघता या मंदिराच्या साफसफाईसाठी वाई येथील राम प्रहार ग्रुप, सह्याद्री करिअर ॲकॅडमी, योगी कोचिंग ॲकॅडमी या संघटना तेथील स्वच्छता व श्रमदानासाठी स्वतःहून येऊ लागले. त्यामुळे या मंदिराच्या देखभालीसाठी दत्त उत्सव समितीची स्थापना झाली. या माध्यमातून येथील श्री दत्तांच्या मंदिर परिसराची देखभाल होऊ लागली.
यावर्षी या मंदिरातील श्री दत्त जयंती उत्सवाचे दि. १४ रोजी ११ वे वर्ष सुरू होत आहे. सकाळी ६ ते ८ श्रींचा रुद्राभिषेक व आरती नंतर सकाळी ८ ते ११ पर्यंत महापूजा व महाआरती, दुपारी १२ ते ७ महाप्रसाद तसेच दुपारी २ ते सायंकाळी ६ पर्यंत रुईघर भजनी मंडळ जावळी, मोळेश्वर भजनी मंडळ (महाबळेश्वर), सिध्दनाथवाडी भजनी मंडळ (वाई), श्रीराम भजनी मंडळ (भिलार) यांच्या भजनाचे कार्यक्रम दत्त उत्सव समितीमार्फत आयोजित करण्यात आले आहेत. भाविकांनी या कार्यक्रमांत सहभागी होत महाप्रसादाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन दत्त उत्सव समिती पसरणी घाट व वाई- पाचगणी- महाबळेश्वर जीप संघटनेमार्फत करण्यात आले आहे.





