Pune | पुण्याची “धूळ’धाण, नागरिकांना त्रास

पुणे : – शहरात उड्डाणपूल, मेट्रो आणि रस्त्यांची कामे सुरू आहेत. यामुळे आरोग्यास हानिकारक असलेल्या “पीएम २.५’ धुलिकणांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे वाहनचालक आणि स्थानिक रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हे धुलिकणांचे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेने मागील वर्षी बांधकाम व्यावसायिकांसाठी नियमवाली जाहीर केली. पण, त्यानंतर कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. त्यामुळे आता संबंधितांना नोटीस बजावण्यात येणार आहे.
उपनगरांमध्ये विशेषत: कोथरूड, बाणेर, बालेवाडी, वारजे माळवाडी कर्वेनगर, धायरी, नऱ्हे, कात्रज, आंबेगाव, हडपसर, कोंढवा, मुंढवा, खराडी, धानोरी, येरवडा, विश्रांतवाडी, बोपोडी तसेच मध्यवर्ती पेठांमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. तसेच सिंहगड रस्ता, विश्रांतवाडी, गणेशखिंड रस्ता यासह अन्य भागांत उड्डाणपूल, रस्ते, मेट्रोची कामे सुरू आहेत. या कामांमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. तर, काही बांधकाम व्यावसायिकांकडून महापालिकेने बंधनकारक केलेल्या उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या भागांतील घरांमध्ये धुलिकण जात आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याची दखल घेत महापालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले यांनी बैठक घेऊन संबंधितांना सूचना करण्याचा निर्णय घेतला आहे.
उपाययोजनांकडे दुर्लक्ष
बांधकामाच्या सीमाभिंतीला २५ फूट उंचे पत्रे लावणे, बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी हिरव्या कापडाने झाकणे. त्यावर पाणी मारणे. यातून धूळ उडण्यावर नियंत्रण आणणे, रस्त्याकडेला काम सुरू असल्यास त्यावर वर्दळीच्या वेळी पाणी मारणे अशा उपाययोजना धूळ नियंत्रणासाठी देण्यात आल्या होत्या. पण, प्रशासनाकडून तपासणी होईपर्यंतच या नियमांचे पालन झाले, असून अनेक व्यावसायिकांनी पुन्हा या नियमांना हरताळ फासला आहे.





