पुणे | भर पावसाळ्यात पुणेकरांच्या तोंडचे पाणी पळाले

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पर्वती, खडकवासला, पद्मावती, वारजे, लष्कर, चतु:शृंगी येथील मनपाच्या जलकेंद्राचा वीजपुरवठा वारंवार खंडीत होत आहे.
त्यामुळे महापालिकेची जलशुद्धीकरण यंत्रणा कोलमडली आहे. परिणामी, ऐन पावसाळ्यात सातत्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. याचा फटका बसत असल्याने अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत.
शहरात अनेक भागांत भूमिगत वीज वाहिन्या आहेत. त्यामुळे मुसळधार पावसाने पाणी साचत असून त्याचा फटका वीज पुरवठ्यावर होत आहे.
त्यामुळे जलकेंद्रांना वीज पुरवठा करणारी केबल जळणे, ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड होणे, यामुळे सातत्याने विद्युत पुरवठा खंडीत होत आहे. यामुळे पंपिंग स्टेशन बंद होतात. त्यामुळे पाणीपुरवठा तत्काळ बंद करण्याची वेळ पाणीपुरवठा विभागावर येते.
यामुळे अर्ध्या शहरातील नागरिकांच्या रोषाला पाणीपुरवठा विभागाला सामोरे जावे लागत आहे. वीज खंडीत झाल्याने मंगळवारी अनेक भागांतील पाणीपुरवठा बंद होता. तसेच उशिरा आणि कमी दाबाने पाणी आल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
हे प्रकार वारंवार होत असल्याने महापालिका प्रशासनही हतबल झाले आहे. पर्वती जलकेंद्राच्या जुन्या आणि नव्या केंद्राची क्षमता ६१० एमएलडी असून लष्कर जलकेंद्रातून सुमारे दीडशे एमएलडी पाणी पुरवठा केला जातो.
पर्वती जलकेंद्र पूर्णच बंद पडल्याने शहरातील सर्व मध्यवर्ती पेठांसह शहराच्या अर्ध्या भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे.
पावसाळ्यात सातत्याने वीजपुरवठा खंडीत होत आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. याबाबत महावितरण प्रशासनासोबत चर्चा सुरू आहे. ही समस्या लवकरच सुटण्याची अपेक्षा आहे. – नंदकिशोर जगताप, पाणीपुरवठा विभाग प्रमुख, मनपा
महावितरणकडून प्रतिसाद मिळेना
यंत्रणेतील बिघाड दूर करावा, तसेच देखभाल दुरुस्ती करावी, यासाठी पाणीपुरवठा विभागाने अनेक वेळा पत्र व्यवहार केला आहे. परंतु महावितरणकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.





