Pune : पुणेकरांची तहान भागणार की घसा कोरडा पडणार

पुणे : विधानसभा निवडणुकांमुळे मागील चार महिन्यांपासून रखडलेली कालवा समितीची बैठक उद्या (शनिवारी) होणार आहे. पालकमंत्री अजित पवार ही बैठक घेणार असून, या बैठकीत जून २०२५ अखेरपर्यंतचा महापालिकेचा पाणी कोटा निश्चित केला जाणार आहे. त्यातच वाढत्या उन्हामुळे शहरात पाण्याची मागणी वाढलेली असतानाच पाटबंधारे विभागाकडून दैनंदिन पाणी वापर कमी करण्याची मागणी सातत्याने महापालिकेकडे केली जात आहे. त्यामुळे या बैठकीत शहरासाठी जूनअखेरपर्यंत पुरेसे पाणी मिळणार, की पाणी कपात केली जाणार, यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
महापालिकेकडून खडकवासला धरणातून सध्या दैनंदिन १५७० एमएलडी पाणी घेतले जात आहे. मात्र, पालिकेने ११५० एमएलडीच पाणी घ्यावे, अशी पाटबंधारे विभागाची मागणी आहे. सध्या खडकवासला धरणात १७.१६ टीएमसी पाणीसाठा असून, पाटबंधारे विभागाकडून नुकतेच ग्रामीण भागासाठी उन्हाळी आवर्तन सुरू करण्यात आले आहे. आता आणखी एक आवर्तन दिले जाणार असून, या दोन्ही वेळी सुमारे ९ टीएमसी पाणी दिले जाणार आहे. त्यामुळे उर्वरीत ८ टीएमसी पाण्यात बाष्पीभवन, शहर, तसेच ग्रामीण भागातील सिंचन योजनांसाठी पाणी देण्याचे नियोजन आहे.
महापालिकेला हवे ७ टीएमसी पाणी
महापालिकेसाठी दरवर्षी जून महिन्याच्या अखेरपर्यंत पाणीसाठा राखीव ठेवला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांत जून महिन्यात पाऊस लांबत असून, जुलै महिन्यात पावसाला सुरुवात होते. त्यामुळे हा पाणीसाठा १५ ऑगस्ट अखेरपर्यंत राखीव ठेवण्याचे नियोजन केले जाते. महापालिकेचा दैनंदिन वापर पाहता महापालिकेस ऑगस्टपर्यंत सुमारे ८ टीएमसी पाण्याची गरज आहे. मात्र, यंदा उन्हाळा वाढलेला असल्याने पाण्याचे बाष्पीभवनही होत असल्याने, तसेच जिल्ह्यातील सिंचन योजनांनाही पाणी द्यावे लागत असल्याने महापालिकेस आवश्यक असलेले पाणी कालवा समितीत मंजूर न झाल्यास पुणेकरांवर ऐन उन्हाळ्यात पाणी कपातीचे संकट ओढावणार आहे.
बैठकीत वादाची शक्यता
काही दिवसांपूर्वीच पाटबंधारे विभागाने महापालिकेने पाण्याची ७०० कोटींची थकबाकी न भरल्यास पुण्याचे पाणी कमी करण्याचा इशारा दिला होता. त्यावरून पाटबंधारे विभाग आणि महापालिकेत वादाची ठिणगी पडली असून, यावरून या बैठकीत वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तर शहरासाठी आधीच कमी मिळत असल्याने पुण्यात पाण्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी असल्याने पालिका प्रशासनाकडूनही या बैठकीत पाटबंधारे विभागाच्या तक्रारी मांडल्या जाणार आहेत.




