Nagar | ऐन पावसाळ्यात ५५ हजार जनता टँकरच्या पाण्यावर

नगर, (प्रतिनिधी) – पावसाळ्याचे दोन महिने जवळपास संपत आले आहे. मात्र, अद्याप काही भागात दमदार पाऊस झाला नाही. दमादार पावसाअभावी जिल्ह्यात ३१ गावे आणि १५३ वाड्यावस्त्यांमध्ये टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे टंचाई गावातील जवळपास ५५ हजार जनता टँकरच्या पाण्यावर तहान भागवत आहे.
सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला तरी संगमनेर, कोपरगाव, नेवासा, पारनेर, श्रीगोंदा या तालुक्यातील काही मोजक्या गावांना एप्रिल, मे महिन्यांत हमखास पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
त्यामुळे यंदा देखील एप्रिल-मे महिन्यांत टँकर सुरु झाले. जून, जुलै व आँगस्ट महिन्यात पाऊस पडून टँकर कमी कमी होत जातील असा अंदाज होता.
मात्र यंदा काही भागात पावसाने ओढ दिल्याने टँकरची संख्या २५ वर गेली आहे. हीच परिस्थिती आॅगस् महिन्यात तशीच आहे. दोन महिन्यात पावसाने ओढ दिल्याने टंचाईग्रस्त गावांमध्ये वाढ होत असून ऐन पावसाळ्यात २५ टँकरद्वारे ३१ गावातील १५३ वाड्यावस्त्यावरील ५५ हजार ७६६ नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या संगमनेर, कोपरगाव, नेवासा, पारनेर, श्रीगोंदा तालुक्यात टँकर सुरु आहेत.
संगमनेर तालुक्यातील २० गावातील ६२ वाड्या वस्त्यावरील २५ हजार नागरिकांची तहान भागवली जात आहे. त्यामध्ये टँकरच्या रोज ३७ फेर्या केल्या जात आहेत. तर कोपरगाव तालुक्यातील २ गावातील १५ वाड्यावास्त्यावरील ४ हजार ४९६ नागरिकांसाठी २ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.
नेवासा तालुक्यातील २ गावे ७ वाड्यावस्त्यावरील २ हजार ६०५ नागरिकांची तहान भागविली जात आहे. पारनेर तालुक्यात सर्वाधिक टँकर सुरु आहेत. ६ गावातील ६९ वाड्यावस्त्यावर १९ हजार ६१६ नागरिकांसाठी ६ टँकरद्वारे पाणी पुरवठा केले जात आहे. तर श्रीगोदा तालुक्यात १ गावात ४ हजार ५५ नागरिकांची तहान भागवली जात आहे.





