इंदिरा गांधींच्या काळात १२ लाखाला १० लाख कर लागायचा; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतलं राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि आम आदमी पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळात जर तुम्ही १२ लाख रुपये वर्षाला कमावले असते, तर त्यावर तुमचं एक चतुर्थांश वेतन कर म्हणून परत घेतले असते.
जर इंदिरा गांधी यांचा काळ असता तर १२ लाखातले १० लाख कर म्हणून घेतले असते. १०-१२ वर्षापर्यंत काँग्रेस सरकारच्या काळात जर १२ लाख कमावले असते तर तुम्हाला २ लाख ६० हजार कर द्यावा लागला असता. मात्र, आता १२ लाखावर एकही रुपया कर द्यावा लागणार नाही, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेस सरकार आपली तिजोरी भरण्यासाठी कर आकारत होती. मात्र, भाजपच्या काळात तुम्हाला १२ लाख रुपयांच्या कमाईवर एकही रुपयाचा टॅक्स लागणार नाही. शनिवारी (०१ फेब्रुवारी) सादर झालेला बजेट हा गरिबांसाठी होता. बजेट करण्यात आलेल्या घोषणेचा फायदा तरुणांना होणार आहे. आज भारत भाजपसोबत आहे. ज्यांनी कोणी विचारत नाही त्यांची विचारपूस मोदी करतो. आप आणि काँग्रेसने जनतेला धोका दिला आहे, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि आपवर केली आहे.
पुढे बोलताना म्हणाले कि, हा मध्यमवर्गीयांसाठी सर्वात अनुकूल अर्थसंकल्प असून हे बजेट ऐकून भारतातील प्रत्येक व्यक्ती आनंदी आहे. बारा लाखांच्या कमाईवर शुन्य टॅक्स करण्यात आला आहे, त्यामुळे मध्यमवर्गातील लोकांचे हजारो रुपये वाचतील. हा बजेट मध्यमवर्गीय लोकांच्या खिशात पैसा खेळता ठेवणारा आहे. दिल्लीतील मध्यमवर्गीयांच्या खिशात हजारो रुपये अतिरिक्त येणार आहेत. स्वातंत्र्यानंतर आयकरात एवढा मोठा दिलासा मिळाला आहे, असंही नरेंद्र मोदी यावेळी म्हटले.





