प्रभात वृत्तसेवा पिंपरी – दोन किंवा जास्त ठिकाणी मतदान यादीत नोंद असलेल्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येईल. मतदारांच्या यादीतील नावापुढे दोन स्टार चिन्हांकित केले जाईल. या मतदारांकडून आधीच ते कोणत्या ठिकाणी मतदान करणार आहेत, याबाबत लेखी घेतले जाईल. जरी दोन ठिकाणी नाव असले तरी त्या मतदाराला एकाच ठिकाणी मतदान करता येईल असे महापालिका निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी गुरूवारी (दि. ६) स्पष्ट केले. मतदार यादीमधील घोळ आणि दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून संपूर्ण राज्यात विरोधकांनी रान उठवले आहे. तसेच मतदार यादीतील दुरुस्ती होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी महाविकास आघाडीसह मनसेने केली होती. शहरात देखील भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये १२ हजारांहून अधिक मतदारांची नावे दुबार असल्याचे पत्र अजित गव्हाणे यांनी महापालिका प्रशासनाला देत आरोप केले होते. मात्र, मतदारयादीत दोन अथवा जास्त ठिकाणी नोंद असलेल्या मतदाराच्या यादीतील नावापुढे दोन स्टार चिन्हांकित केले जाणार आहे. या मतदाराकडून आधीच तो कोणत्या ठिकाणी मतदान करणार, हे लिहून घेतले जाईल. दोन ठिकाणी नाव असले तरी तो एकाच ठिकाणी मतदान करेल. ज्याने आधी लिहून दिले नसेल आणि तो मतदार एखाद्या केंद्रात मतदानाला गेल्यास तिथे त्याच्याकडून हमीपत्र लिहून घेतले जाईल. त्यानंतरच त्याला तेथे मतदान करू दिले जाईल, अशी माहिती उपायुक्त सचिन पवार यांनी दिली. १ जुलै २०२५ रोजीची मतदार यादी निवडणुकीसाठी ग्राह्य धरण्यात आली आहे. त्यामुळे आता त्या यादीमध्ये एकही नाव कमी करणे किंवा जोडणे शक्य नाही. तसेच त्या यादीमध्ये काही नावे दुबार असल्याची शक्यता आहे. अशी दुबार नावे शोधली जात आहेत. पुढील आठवड्यात १४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर २२ नोव्हेंरपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात येणार आहे. प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊऩ अंतिम मतदार यादी ६ डिसेंबरला प्रसिद्ध केली जाईल. तसेच मतदान केंद्रनिहाय मतदार यादी १२ डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दुबार नावे असलेल्या मतदारांना एकपेक्षा जास्त ठिकाणी मतदान करता येऊ नये यासाठी त्यांच्या नावापुढे दोन स्टार दिले जाणार आहेत. “मतदार यादीबाबत प्रशासन गांभीर्याने विचार करत आहे. दुबार मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येईल. त्यासाठी नावापुढे चिन्हांकित केले जाईल. तसेच त्यांच्याकडून कुठे मतदान करणार आहे, हे लेखी घेतले जाईल. मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गेल्यानंतर देखील ज्यांच्या नावापुढे स्टार आहे. त्यांच्याबाबत माहिती घेऊनच मतदान करू दिले जाईल.” – सचिन पवार, उपायुक्त.