satara | राजाचे कुर्ले गावात जलसंधारण कामाचा डंका

पुसेसावळी, (प्रतिनिधी)- खटाव तालुका हा नेहमीच दुष्काळी म्हणून ओळखला जातो. परंतु, याच तालुक्यातील राजाचे कुर्ले गाव दुष्काळाशी गेल्या काही वर्षांपासून दोन हात करत आहे. पानी फाउंडेशनच्या२०१८ च्या वॉटर कप स्पर्धेत गावातील काही युवक व महिलांनी जलसंधारण, मृदासंधारणाचे रितसर प्रशिक्षण घेऊन संपूर्ण गावाने एकजुटीने मृदासंधारणासाठी काम केले.
राजाचे कुर्ले गावात 2023 व 2024 मध्ये जलसंधारणाचे पोकलेन मशीनचे साह्याने मोठ्या प्रमाणात काम झाले. त्यामध्ये डोंगर पायथ्याला व डोंगर माथ्यावर डीप सीसीटीचे मोठ्या प्रमाणात काम झाले. एकूण 26 हजार 800 मीटर एवढे डीप सीसीटीचे मोजमाप झाले. 2700 मीटर ओढा व नाले रुंदीकरण व खोलीकरण करण्यात आले.
या सर्व जलसंधारणाच्या कामामुळे एका पावसात सुमारे २० कोटी लिटर पाणी गावात साठणार आहे व त्यामुळे राजाचे कुर्ले गावच्या पाणलोटातील भूगर्भ साठ्यातील पाण्याचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे शेतीसाठी 12 महिने पाण्याची उपलब्धता होणार आहे. या सर्व कामासाठी सायट्रीज संस्था तसेच जाखणगावची शिवार सामाजिक संस्था, ग्रामस्थ व राजाचे कुर्ले ग्रामपंचायत यांनी सिंहाचा वाटा उचलत मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचे काम हाती घेतले आहे.
तसेच यापुढील टप्प्यात वृक्ष लागवड व संवर्धनाचा कार्यक्रम हाती घेतला जाणार असून येणाऱ्या पावसाळ्यात एक लाख झाडे लावण्याचा संकल्प गावकऱ्यांनी केला आहे. डोंगरमाथ्यावरील व डोंगर पायथ्यावरील डीप सीसीटी गावातील ओढे व शिवारातील नाल्यांवरून लिंब, चिंच, वड, पिंपळ, पिंपरण, करंज तसेच विविध प्रकारची जंगली झाडे लावली जाणार आहेत.
तसेच सायट्रीज संस्थेमार्फत शेतकऱ्यांच्या शेत बांधावर आंबा, नारळ व तत्सम प्रकारची शेतकऱ्याला फायदा देणारी फळझाडे लावली जाणार आहेत व त्यांचे संगोपन केले जाणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राजाचे कुर्ले गाव दुष्काळमुक्ती कडे वाटचाल करत आहे.





