प्रभात वृत्तसेवा पिंपरी – भरधाव डंपरने धडक दिल्यामुळे रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी मंगळवारी (दि.४) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.जितेश राजू सैनी (वय ३०, रा.मावळ. मूळ रा. राजस्थान) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय सतीश मडकर (वय २७, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोहम्मद फिरोज आलम (वय २९, रा.वडगाव मावळ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात मंगळवारी (दि.४) सायंकाळी मावळ तालुक्यातील मंगरूळ येथे घडला. फिर्यादी अक्षय यांचा मित्र जितेश सैनिक हा त्याच्या दुचाकीवरून जात होता. मंगरूळ येथे पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर त्याने रस्त्याच्या बाजूला दुचाकी थांबवली आणि पायी रस्ता ओलांडत होता. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या डंपरने जितेश याला धडक दिली. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.