रांजणी, (वार्ताहर) – आपण सर्वांनी शाश्वत विकासासाठी साथ देणे गरजेचे आहे. सध्या तालुक्यात नवीन टूम निघाली आहे. बस भरून देव दर्शनाला महिलांना घेऊन जायचे. पण या अमिशाला जागरूक मतदारांनी बळी पडू नये. यावेळेस विधानसभेला वेगळे वातावरण तयार झाले आहे. परंतु सर्वसामान्य ग्रामीण भागातील जनतेने विकासाच्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे, असे प्रतिपादन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. वळती (ता. आंबेगाव) येथे महायुतीचा सहविचार मेळावा रविवारी (दि.२९) आयोजित करण्यात आला होता. वळसे पाटील यांचे आगमन होताच जेसीबीतून फुलांची वृष्टी करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता. सहकारमंत्री वळसे पाटील म्हणाले, यामागील काळात आंबेगांव तालुक्यात इंजिनिअरिंग कॉलेज, विजेसंबंधीचा प्रश्न, साडेसात एचपीपर्यंतच्या कृषी पंपाची विजबिल माफी, मुलींना पदवीपर्यंत शैक्षणिक फी माफी आदी निर्णय घेतले आहे. मी आजपर्यंत आमदार होण्यासाठी निवडणूक लढवत नाही. तुमच्यात बदल होण्यासाठी तसेच विकासासाठी निवडणूक लढवत आहे. मी आजपर्यंत शासनाच्या माध्यमातून जी विकास कामे केली आहे. तर प्रत्येक गावोगांवी फिरायला पाहिजे का ? हा सवाल सहकार मंत्री वळसे पाटील यांनी उपस्थितांना केला. यावेळी शरद बँकेचे संचालक शिवाजीराव लोंढे, बाळासाहेबा बेंडे, रमेश खिलारी, रवींद्र करंजखेले यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच यावेळी सुषमा शिंदे, अंकित जाधव, अजय आवटे, जे. डी. टेमगिरे, सुनील बाणखेले, गणपत इंदोरे, मथाजी पोखरकर, नितीन वाव्हळ, बाबा खालकर, गोविंद खिलारी, सूर्यकांत थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.