पुणे | आचारसंहितेच्या धास्तीमुळे निविदांचा कालावधी घटला

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता आठ ते दहा दिवसांत लागण्याची शक्यता असल्याने विकासकामांचा शुभारंभ लवकर करण्यासाठी राज्य शासनाने निविदांचा कालावधी कमी केला आहे.
त्यानुसार 10 लाख ते 100 कोटींपर्यंतच्या कामांचा कालावधी हा आठ ते पंधरा दिवस एवढाच करण्यात आला आहे.
विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्याने ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे.
मात्र, निविदांचा कालावधी हा 15 दिवस ते 30 दिवस इतका असल्याने निवडणुकीच्या आधी मंजूर करण्यात आलेल्या कामांना वर्क ऑर्डर देऊन प्रत्यक्ष कामे सुरू होण्यास महिना लागेल.
त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने शासन निर्णय प्रसिद्ध करून ई निविदांचा कालावधी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
10 लाख ते दीड कोटी पर्यंतच्या कामांसाठी निविदांचा कालावधी आठ दिवस, तर दीड कोटी ते 25 कोटींच्या कामांसाठी आठ दिवस, 25 कोटी ते 100 कोटींच्या कामांसाठी 15 दिवस आणि 100 कोटींच्या कामांसाठी निविदांचा कालावधी 21 दिवस करण्यात आला आहे. हा निर्णय येत्या दि. 30 आॉक्टोबर 2024 पर्यंतच असणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.




