पिंपरी | सततच्या वातावरणीय बदलामुळे सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले

देहूगाव, (वार्ताहर) – वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे शहर परिसरात सर्दी, खोकला, ताप, थंडी या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. सोबत डासांचा प्रादूर्भाव वाढत असल्याने डेंग्यू, चिकनगुनिया सारख्या रोगांचाही प्रसार होत आहे. यापार्श्वभूमीवर कोणत्याही ताप अथवा इतर आजाराकडे नागरिकांनी दुर्लक्ष करू नये.
प्रत्येक गुरुवारी कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
देहू परिसरामध्ये सुमारे १० मोठे रुग्णालये, २३ हून अधिक दवाखाने तर ७ पॅथॉलॉजी सेंटर आहेत. सध्या हवामानात वारंवार बदल होत आहे.
त्यामुळे थंडी, ताप, सर्दी, खोकला यांसारख्या आजारातील रुग्णांची संख्या वाढत आहे. परिसरामध्ये जूनपासून साधारण १ हजार ७० हुन अधिक डेंगू सदृश्य रुग्णांची फक्त प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तपासणी केल्याची नोंद आढळली आहे.
यामध्ये डेंगू, चिकनगुनिया सदृश्य रुग्ण आढळून आले आहेत. खासगी रुग्णालयातील रुग्णाची माहिती संकलित करण्यात येते आहे.
नगरपंचायत प्रशासन आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील नागरिकांच्या घरोघरी रुग्णांची तपासणी व सर्वे करण्यात येत असून जनजागृती करीत आहे. त्यासाठी औषध फवारणी सुरू करण्यात आले आहे. कोणताही ताप आल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांचा सल्ला घेऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
डेंग्यू, मलेरियाची, चिकुनगुण्या लक्षणे
तीव्र डोकेदुखी, स्नायू व सांधेदुखी, तोंडाची चव जाणे, अचानक येणारा तीव्र ताप, डोळ्यांच्या हालचालीस त्रास होणे, मळमळ होणे. शरीरावर पुरळ येणे.
वरील लक्षणे आढळल्यास देहूगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत औषधोपचार उपलब्ध असून त्वरित औषधोपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रतिबंधात्मक उपाययोजना –
१. घरातील पाणीसाठे ७ दिवसांपेक्षा जास्त साठवू नये. आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस पाळावा.
२. घरातील पाणी साठ्याच्या टाक्या, हौद, फ्रिज, बैरल, कुलर, कुंड्या मधील पाणी दर ७ दिवसांने बदलावे.
३. घराभोवती पाणी साठणाऱ्या टाकाऊ वस्तू, पत्र्याचे डबे, नाराळाच्या करवंट्या आदी नष्ट करावीत.
४. डास उत्पत्ती स्थानांवर नियंत्रण राखण्यासाठी डास उत्पत्ती स्थानामध्ये डास आळी भक्षक गप्पी मासे सोडावेत.
५. गच्चीवरील व जमिनीवरील पाण्याच्या टाक्यांची झाकणे घट्ट लावावीत त्यामध्ये फट ठेवू नये.





