पुणे – मुदत ठेवीची रक्कम योग्य वेळेत न दिल्याने पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने डीएसके दांपत्य, डीएसके अॅण्ड असोसिएट्सला आणखी एक दणका दिला आहे. तक्रारदारांना २ लाख रुपये ५ मार्च २०२० पासून वार्षिक ५ टक्के व्याजाने देण्याचा आदेश दिला आहे. याबरोबरच मानसिक त्रासापोटी १०, तक्रारीच्या खर्चापोटी ७ हजार रुपये द्यावेत. निकालाची प्रत मिळाल्यासून ४५ दिवसाच्या आत या आदेशाची पूर्तता करावी. अन्यथा वार्षिक ७ टक्के व्याज द्यावे लागेल, असेही आदेशात म्हटले आहे. असेही आयोगाचे अध्यक्ष अनिल जवळेकर, सदस्या सरीता पाटील यांनी आदेशात म्हटले आहे. याबाबत मृदुला श्रीकांत साठे आणि श्रीकांत रघुनाथ साठे (रा. कोथरूड) यांनी अॅड. ज्ञानराज संत यांच्यामार्फत ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल केली होती. १६ मार्च २०२१ रोजी ही तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारदारांनी कष्टाच्या कमाईतील १ लाख रुपये ४ एप्रिल २०१५ रोजी डीएसके अॅण्ड असोसिएट्मध्ये मुदत ठेव म्हणून ५९ महिन्यांसाठी गुंतवले. या गुंतवणुकीवर १४.१९ टक्के त्रिमासिक चक्रवाढ व्याज देण्याचे कबूल केले. ठेव ३ मार्च २०२० रोजी परिपक्व झाली. ४ मार्च २०२० रोजी कंपनीने तक्रारदारांना १ लाखाचा धनादेश दिला. मात्र, हा धनादेश वटला नाही. रक्कम परत मिळावी म्हणून तक्रारदारांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. ६ जून २०२० रोजी कंपनीला पत्र लिहून गुंतवणूकीची रक्कम परत करण्याची विनंती केली. मात्र, कंपनीने गुंतवलेली रक्कम आणि त्यावरचे व्याज परत न केल्याने तक्रारदारांनी ग्राहक आयोगात धाव घेत तक्रार दाखल केली. कंपनीमध्ये गुंतवलेली रक्कम व्याजासहीत परत मिळावी, मानसिक त्रासापोटी १ लाख, तक्रारीच्या खर्चापोटी ५० हजार रुपये मिळावे, अशी मागणी केली. या प्रकरणी कंपनीने लेखी म्हणणे दाखल केले. डीएसके दांपत्य १७ फेब्रुवारी २०२० पासून न्यायालयीन कोठडीत आहे. शिवाय कंपनीची कागदपत्रे २०१८ पासून पोलिसांच्या ताब्यात आहेत. बँक स्टेटमेंट, बुक अकाउंट पाहिल्या शिवाय तक्रार योग्य आहे की नाही? हे सांगता येणार नाही. त्यामुळे कंपनी विरुद्ध कोणताही आदेश पारित न करण्याची विनंती केली. आयोगाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत आयोगाने निकाल दिला.