पुणे जिल्हा | अजितदादांच्या सहयोग निवसस्थानाबाहेर ढोलबजाओ

बारामती, (प्रतिनिधी) – राज्य मंत्रिमंडळाच्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीमध्ये धनगर आरक्षणाबाबत कोणताही निर्णय झाला नाही त्यामुळे धनगर समाजाने आक्रमक भूमिका घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी (ता. बारामती) येथील सहयोग निवासस्थानाबाहेर ढोल बजाव आंदोलन केले.
नरहरी झिरवळ यांना पुढे करून अजित पवार धनगर बांधवांचा आरक्षण हाणून पाडत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला.
अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी ही धनगर समाजाची प्रमुख मागणी आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील धनगर बांधव आक्रमक झाला आहे.
राज्यातील एकाच कुटुंबातील धनगड जातीचे सहा दाखले रद्द केल्यानंतर धनगर समाज आरक्षणाबाबत आशावादी झाला.
मात्र सरकारच्या शेवटच्या कॅबिनेटपर्यंत कोणताही निर्णय झाला नाही त्यामुळे धनगर समाज आक्रमक झाला. आरक्षणाच्या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.
आरक्षणाचा निर्णय नाही झाल्यास मताच्या पेटीतून धनगर बांधव या सरकारला त्याची जागा दाखवून देईल, असा इशारा धनगर बांधवांनी सरकारला दिला आहे.
आंदोलनात धनगर समाजाचे नेते नवनाथ पडळकर, अॅड. अमोल सातकर, बापूराव सोलनकर, चंद्रकांत वाघमोडे, विशाल कोकरे, विक्रम कोकरे, रवींद्र टकले, सुहास टकले, महादेव कोकरे, विठ्ठल कोकरे, आप्पा सूळ आदींसह धनगर बांधव आंदोलनात सहभागी झाले होते.





