जालना : धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समावेश करून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी जालना शहरात दीपक बोऱ्हाडे यांनी आचरण केलेले १६ दिवसांचे आमरण उपोषण आज स्थगित करण्यात आले. उपोषणामुळे त्यांची प्रकृती गंभीररीत्या खालावली असताना समाजबांधवांच्या विनंतीवर आणि शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी हे उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. मुलीच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण मागे घेण्यात आले, ज्यामुळे धनगर समाजात दिलासा मिळाला असला तरी मागणी पूर्ण न झाल्याबाबत असमाधान कायम आहे. धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी दीपक बोऱ्हाडे यांनी १६ सप्टेंबरपासून जालना शहरात उपोषणाला बसले होते. या कालावधीत त्यांची तब्येत झपाट्याने बिघडली, तरीही ते ठाम राहिले. आज उपोषण सोडण्यापूर्वी बोऱ्हाडे यांनी आपल्या शिष्टमंडळाची बैठक घेतली, ज्यात उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. समाजबांधवांनी त्यांना विनंती केली की, आरोग्याची काळजी घेऊन लढा पुढे चालवावा. यानुसार, बोऱ्हाडे यांच्या मुलीने त्यांना ज्यूस पाजून उपोषण संपवले. या घटनेने उपस्थितांना भावूक केले आणि धनगर समाजाच्या लढ्याला नवे वळण मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली. सरकारला थोडा वेळ; मुद्दा सोडणार नाही उपोषण सोडल्यानंतर बोलताना दीपक बोऱ्हाडे यांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला. ते म्हणाले, “सरकारला थोडा वेळ द्यायला हवा. हा लढा टिकवण्यासाठी आम्ही आशावादी आहोत. उपचार घेऊन प्रकृती सुधारल्यानंतर मी राज्यभर दौरा करणार असून, गाव-खेड्यातील धनगर समाजाला एकत्र आणणार आहे. मुंबईत हा प्रश्न सुटला नाही तर दिल्लीला जाऊन लढा देऊ.” यामुळे धनगर आरक्षणाचा मुद्दा आगामी काळात पुन्हा तापण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आधी सरकारने बोऱ्हाडे यांची भेट घेऊन उपोषण सोडण्याची विनंती केली होती. जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, मंत्री गिरीश महाजन, आमदार अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. यावेळी महाजन यांनी विशेषत: उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती, मात्र तेव्हा बोऱ्हाडे यांनी ठामपणे नकार दिला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही फोनवरून बोऱ्हाडे यांच्याशी संवाद साधला असून, एसटी दर्जा केंद्र सरकारच्या अधिकार क्षेत्रात असल्याचे सांगितले. राज्य सरकार केंद्राशी चर्चा करून प्रस्ताव पाठवेल, अशी खात्री दिली होती. मात्र, बोऱ्हाडे यांनी याबाबत लिखित हमी मागितली होती.