Education : राज्य सरकारचा मोठा निर्णय; विद्यार्थ्यांनी भरलेले परिक्षा शुल्क परत मिळणार, मदतीसाठी संपर्क क्रमांक जारी
Education : दुष्काळग्रस्त तालुक्यांतील २ लाख ४० हजार ३६५ विद्यार्थ्यांनी ‘झिरो चलन’ सुविधेतून परीक्षा शुल्क न भरता अर्ज दाखल केला. शुल्कमाफीची प्रक्रिया जाणून घ्या.

Education : दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा लाभ मिळावा, यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने परीक्षा अर्ज प्रक्रियेत ‘झिरो चलन’ सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत २ लाख ४० हजार ३६५ विद्यार्थ्यांनी एकही रुपया परीक्षा शुल्क न भरता परीक्षा अर्ज दाखल केला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
दुष्काळामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी शासनाने पात्र विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी संचालनालय, विद्यापीठे आणि परीक्षा विभागाच्या स्तरावर आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.
परीक्षा अर्ज भरताना शुल्क भरण्याची गरज पडू नये, यासाठी ‘झिरो चलन’चा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क न भरता अर्ज करता येत आहे. सर्व विद्यापीठांनी याबाबत परिपत्रकेही जारी केली आहेत.
ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी परीक्षा शुल्क भरले आहे, त्यांना ते शुल्क परत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र विद्यार्थी या सवलतीपासून वंचित राहू नये, यासाठी सर्व विद्यापीठांना सूचना देण्यात आल्या आहेत.
परीक्षा शुल्कमाफीबाबत अडचण असल्यास विद्यार्थ्यांनी संबंधित विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळ, विद्यार्थी विकास विभाग किंवा जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे.
विद्यापीठनिहाय संपर्क :
मुंबई विद्यापीठ – डॉ. पूजा रौंदळे (९३२२०२०५८९).
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – डॉ. राजेंद्र तलवारे (९८९०६४२४३१).
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – डॉ. अजितसिंग एन. जाधव (९५४५५९५९९९).
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ – डॉ. अंधारे (९९७५०५५१५५).





