‘इंडियन व्हेरियंट’ पोस्टबाबत केंद्र सरकारचा सोशल मिडीया कंपन्यांना नवीन आदेश

नवी दिल्ली – भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी कॉंग्रेसला लक्ष्य करण्यासाठी जी बनावट टुलकिट कागदपत्रे ट्विटरवर प्रकाशित केली आहेत त्याची ट्विटरने पोलखोल करून ती बनावट असल्याचा शिक्का त्यावर मारल्याने केंद्र सरकार आक्रमक झाले आहे. त्यांनी सर्व सोशल मिडिया कंपन्यांना इंडियन व्हेरियंट असा उल्लेख असलेल्या पोस्ट काढून टाकण्याची सूचना केली आहे.
करोनाचा जो विषाणू बी.1.617 नावाने ओळखला जातो त्याला इंडियन व्हेरियंट असे जागतिक आरोग्य संघटनेने संबोधलेले नाही त्यामुळे असा उल्लेख असलेल्या पोस्ट काढून टाकाव्यात अशी सूचना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केली आहे. संबित पात्रा यांच्या पोस्ट मध्ये या शब्दाचा उल्लेख आहे. त्यांनी कॉंग्रेसच्या बोगस लेटरहेडवर मोदींचा उल्लेख इंडियन व्हेरियंट म्हणून करण्यात आल्याचे म्हटले होते.
पण संबित पात्रा यांची ही माहिती व डॉक्युमेंट बनावट असल्याचे ट्विटरने म्हटले होते व तसा शिक्का त्यांनी पात्रा यांच्या पोस्टवर मारला आहे. त्यानंतर भारत सरकारने आणि भाजपने ट्विटरला हा शिक्का काढून टाकण्याची सूचना केली होती. पण त्याला ट्विटरने दाद दिली नाही. या पार्श्वभूमीवर हा नवीन आदेश भारत सरकारने काढला आहे असे सांगण्यात येते.





