ड्रोन तंत्रज्ञान 21 व्या शतकातील आधुनिक शेतीच्या दृष्टीने मैलाचा दगड : मोदी

नवी दिल्ली – देशातील विविध शहरांमध्ये शेतीसाठी उपयोगी ठरणाऱ्या किसान ड्रोनचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रारंभ केला. 21 व्या शतकातील आधुनिक शेती सुविधांच्या दिशेने हा एक नवीन अध्याय आहे. ही नवीन सुरुवात म्हणजे ड्रोन क्षेत्रातील एक मैलाचा दगड ठरेल, यातून अमर्याद संधीही उपलब्ध होतील, असा आपल्याला विश्वास वाटतो आहे, असे पंतप्रधान मोदींनी यावेळी बोलताना सांगितले. या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये कृषी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित उद्योगांना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठे प्रोत्साहन दिल्याचा उल्लेखही पंतप्रधानांनी यावेळी केला.
किसान ड्रोन, शेतकऱ्यांसाठी डिजिटल आणि उच्च तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांना सरकारकडून प्रोत्साहन दिले जाणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती, याचा उल्लेखही पंतप्रधानांनी केला.
आज गावांमध्ये ड्रोनच्या मदतीने जमीन, घरे यांच्या माहितीची नोंदवही तयार केली जात आहे. ड्रोनच्या मदतीने औषधांचा पुरवठा केला जात आहे. अतिशय दुर्गम ठिकाणी करोनारोधक लस पोहोचविण्याचे काम ड्रोनच्या मदतीने करण्यात आले आहे. अनेक स्थानी शेतांमध्ये औषधांची फवारणी करण्याचे कामही या ड्रोनच्या मदतीने सुरू करण्यात आले आहे.
आगामी काळामध्ये उच्च क्षमतेच्या ड्रोनच्या मदतीने शेतकरी आपल्या शेतांतून ताज्या भाज्या, फळे, फुले बाजारामध्ये पाठवू शकतात. नाशवंत मालाचे कमी वेळेमध्ये वितरण व्हावे आणि कमीत कमी नाश व्हावा, कमीत कमी नुकसान व्हावे, यासाठी मत्स्य व्यावसायिक, शेतकरी यांनी आपला माल ड्रोनने बाजारात पाठवू शकतील.
आता देशामध्ये 200 पेक्षा जास्त ड्रोन स्टार्टअप्स कार्यरत आहेत. लवकरच यांची संख्या हजारोंमध्ये पोहोचेल. यामुळे रोजगाराच्याही लाखो नवीन संधी निर्माण होतील, अशी आशाही पंतप्रधानांनी व्यक्त केली.





