बीड – गेवराई तालुक्यातील विविध ठिकाणी सोमवारी सहा वाजण्याच्या सुमारास वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला असून या पावसामुळे खरीपाच्या शेती मशागतीसाठी फायदा होणार आहे. दरम्यान वादळीवाऱ्यासह पावसामुळे आंब्याचे नुकसान झाले आहे. गेवराई तालुक्यात रेवकी, तलवाडा, जातेगाव, सिरसदेवी, पाचेगाव , मादळमोही, चकलांबा, धोंडराई सह दहा महसूल मंडळे आहेत. गेवराई तालुक्यात दरवर्षी खरीपातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाची जवळपास ८० हजार हेक्टरवर लागवड शेतकरी करत आहेत.दरम्यान गेल्या काही दिवसांपासून खरीपाच्या मशागतीसाठी शेतकरी राबत असून सोमवारी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. हा पाऊस खरीपाच्या मशागतीसाठी पोषक ठरणार आहे. मात्र वादळीवाऱ्यासह पावसामुळे आंब्याचे नुकसान झाले असल्याचे शेतकरी सांगतात तर वादळी वाऱ्यासह पावसामुळे काही तास विद्युत पुरवठा खंडित झाला होता. पाटोदा तालुक्यातही सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. पाटोदा शहरास वैद्यकिन्ही, पारगाव व महासांगवी परिसरात रिमझिम धारा कोसळल्या. या पावसामुळे काही काळासाठी वीजेचा खोळंबा झालेला होता. मात्र, केवळ १५ ते २० मिनिटे या मेघ धारा कोसळल्या. यासह मेघगर्जना व वादळी वारेही या परिसरात सुरू होते. दरम्यान, शिरूर तालुक्यातही सकाळपासून ढगाळ वातावरण होते. मात्र, कसलाही पाऊस झालेला नाही. दरम्यान, गतवर्षी जून महिन्याच्या सुरूवातीच पावसाने हजेरी लावली होती. मात्र, उत्तर काळात पावसाने दडी मारल्याने खरीपाचा मोठा खोळंबा झाला होता. यंदा प्रशासनाच्या वतीने खरीप हंगामाची जय्यत तयारी करण्यात येत आहे. खते, बि, बियाणे मागवण्यात आलेली असून आवक लवकरच सुरु होणार आहे. केज, परळीत प्रचंड उकाडा केज, परळीत उकाड्याने नागरिक हैराण दिवसभर उष्ण व ढगाळ वातावरण राहिल्याने केज व परळी परिसरात नागरिकांचे चांगलेच हाल झाले. किमान सायंकाळी पावसाचा एखादा शिडकावा होऊन गेल्यास उकाड्यापासून सुटका होईल, अशी आशा होती. मात्र रात्री दहा वाजेपर्यंत पावसाने हजेरी लावली नाही.