वाहनचालकांनो सावधान! वाहतूक शिस्तीसाठी पुणे पोलिसांकडून AIचा वापर; नियमभंग करताच ताबडतोब ‘ई-चलान’

पुणे : शहरातील वाहतूक नियमभंग रोखण्यासाठी आणि रस्त्यांवरील शिस्त वाढवण्यासाठी पुणे पोलिसांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि मोबाईल अॅपचा वापर करणारा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. आज पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले.
एफसी रोडवर २८ मे २०२५ पासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेल्या या प्रकल्पात, AI-आधारित कॅमेऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांत ३,९४९ नियमभंग प्रकरणे नोंदवली. यात १,३३५ ‘नो पार्किंग’, १,८८६ ‘डबल पार्किंग’, ७१९ ‘राँग साईड ड्रायव्हिंग’, ४२ ‘ट्रिपल सीट’ आणि ९ ‘मोबाईल वापरताना वाहन चालवणे’ यांचा समावेश आहे.
या स्वयंचलित प्रणालीमुळे मानवी हस्तक्षेपाशिवाय कारवाई होत असून, केवळ १% वाहनचालकांनी पुन्हा नियमभंग केल्याचे दिसून आले आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन शिस्तीत मोठी सुधारणा झाल्याचे पोलिसांनी नमूद केले. आता हा प्रकल्प विस्तारताना, AI कॅमेरे बसवलेली गस्ती वाहने शहरात फिरून नियमभंग करणाऱ्यांना ट्रॅक करत ई-चलान जारी करतील.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, “हा उपक्रम वाहतूक व्यवस्थापनात क्रांती आणेल. एआय तंत्रज्ञानामुळे नियमभंगावर तात्काळ कारवाई शक्य होत आहे, ज्यामुळे रस्ते अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध होतील.” या उपक्रमामुळे पुण्यातील वाहतूक व्यवस्था अधिक कार्यक्षम होण्याची अपेक्षा आहे.





