डोंबिवली – डोंबिवलीच्या नांदिवली परिसरात शिंदेसेनेच्या नेत्यावर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. पैशांच्या देवाण-घेवाणीवरुन पदाधिकारी आणि त्यांचा चालक यांच्यात भर रस्त्यात वाद झाला. हा वाद इतका वाढला की त्याचे रुपांतर रक्तरंजित राड्यात झाले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. सुदाम जाधव हे शिंदेसेनेचे पदाधिकारी आहे. त्यांच्या वाहनावर मनोज नाटेकर हा चालक म्हणून काम करतो. डोंबिवली पूर्वेतील नांदिवली परिसरात भर रस्त्यात या दोघांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद आणखी वाढल्यानंतर मनोज नाटेकरने सुदाम जाधव यांच्यावर तेट चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सुदाम हे जखमी झाले. त्यानंतर सुदाम यांनी प्रतिकार केला. या घटनेची माहिती काही नागरीकांनी मानपाडा पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या हल्ल्यात जखमी झालेल्या सुदाम जाधव यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर मनोज नाटेकर याला मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले.