Drainage Overflow: चेंबरमधून पाणी थेट दारात! स्वच्छतेचा पुरस्कार मिळालेल्या वसाहतीची झाली दैना; दुर्गंधीने नागरिक त्रस्त
Drainage Overflow: रेल्वे लाईनजवळील तांत्रिक बिघाडामुळे ड्रेनेजचे पाणी साचले; परिसरातील लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर.

Drainage Overflow – राजीव गांधी नगर वसाहतीत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. रेल्वे लाइनजवळ असलेल्या एका चेंबरमधून उकळ्या फुटल्याप्रमाणे पाणी बाहेर पडत असून, ते थेट नागरिकांच्या घराच्या दारापर्यंत पोहोचले आहे. हे पाणी दिसायला स्वच्छ असले, तरी त्याला दुर्गंधी येत असल्याने परिसरातील आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
राजीव गांधी वसाहत ही यापूर्वी स्वच्छतेचा पुरस्कार मिळालेली वसाहत आहे. मात्र सध्या येथील अस्वच्छतेचे चित्र पाहता हा पुरस्काराचा मान राखला जात नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. सध्या पावसाळा तोंडावर असून, आताच अशी परिस्थिती असताना जोराचा पाऊस झाल्यास मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल, अशी भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
दिवसभर मोलमजुरी आणि कष्ट करून उदरनिर्वाह करणाऱ्या या लोकवस्तीमध्ये चेंबरचे साचलेले पाणी आता नागरिकांच्या घरातही शिरले आहे. यामुळे नागरिकांना आरोग्याच्या प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. साचलेल्या पाण्याची दुर्गंधी संपूर्ण परिसरात पसरत असून, यामुळे वयस्कर नागरिकांना श्वसनाचे आजार जडण्याची शक्यता आहे.
तसेच हे पाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या परिसरातही साचत असल्याने तेथे खेळणाऱ्या लहान मुलांच्या पायाला इजा होण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने ही भूमिका स्पष्ट करत नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर नियंत्रित करून ते ड्रेनेजमध्ये न सोडण्याचे आवाहन केले आहे.
“या ठिकाणची ड्रेनेजची लाइन वळलेली आहे, त्यामुळे ती साफ करण्यात काही तांत्रिक अडचणी येतात. मात्र तरीदेखील आम्ही लवकरच त्या लाईनची सफाई करून घेऊ. परंतु नागरिकांनीही जागरूक राहण्याची गरज आहे. पिण्याच्या नळाचे पाणी जास्त प्रमाणात ड्रेनेजमध्ये सोडल्यानेही असा ओव्हरफ्लो होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी पाणी वाहून देण्यावर नियंत्रण आणावे.”
– अमित दीक्षित, ड्रेनेज विभागाचे मुख्य अभियंता

