पिंपरी | खोपोली नगरपरिषदेच्या नालेसफाईची पोलखोल

खालापूर, (समाधान दिसले ) – विकेंडच्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे खोपोली शहरातील अनेक भागात पाणी तुंबल्याचे चित्र दिसले होते. पावसाचे प्रमाण जास्त असले तरी देखील मोक्याच्या ठिकाणी पाण्याचा निचरा न झाल्याने पाणी साठून तळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. यंदा मुसळधार असा झालेला हा पहिलाच पाऊस होता.
त्यामुळे नालेसफाईबाबत स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या खोपोली नगरपरिषदेला पावसानेच जोरदार चपराक दिली आहे. पालिकेच्या कामात प्रामाणिकपणा नव्हताच त्यामुळे मुसळधार पावसात नालेसफाईची पोलखोल झाली, अशी चर्चा नागरिक करत आहेत.
अतिवृष्टीमुळे दरवर्षी खोपोली शहरातील मुख्य गटारे, नाले तुडूंब भरून वाहतात. गटारे आणि नाल्यांचे पाणी जेव्हा योग्य पद्धतीने वाहून जात नाही तेव्हा ते रस्त्यावरून धावू लागते आणि शहरात पुरासारखी स्थिती निर्माण होता. असे होऊ नये यासाठी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नगरपरिषदे मार्फत नालेसफाईची कामे हाती घेतली जातात. यंदा देखील नगर परिषदेने दोन महिने शहरातील ओढे, छोटे-मोठे नाले, गटार लाईन यांची साफसफाई केली. परंतु ही साफसफाई योग्य पद्धतीत झाली नाही हे आता सिद्ध झाले आहे.
तलावात दुषित पाणी शिरल्याने नागरिक संतप्त –
लौजी परिसरात दरवर्षी पाणी साठते. परंतू यंदा वरच्या खोपोलीसह शहरातील इतर भागातील गटारे देखील तुंबली होती. सखल भागातील अनेक घरांसमोर तलावासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. वरच्या खोपोलीतील गटाराचे पाणी शंकर मंदिर तलावात शिरले. त्यामुळे तलावातील पाणी प्रदूषित झाले. या तलावातील पाणी नागरिक पितात. त्यामुळे आता अशुद्ध पाणी पिण्याची वेळ खोपोलीकरांवर आली असून यातून आरोग्याचे प्रश्व निर्माण होऊ शकतात. शहरातील मुख्य भागात झालेल्या गैरसोयीने नागरिक चांगलेच संतप्त झाले आहेत.
खोपोली शहरात पावसाचे प्रमाण जास्त असते. शहराला अर्धा अधिक डोंगराचा वेढा असून तिथून येणारे नैसर्गिक प्रवाह यामुळे शहरातून वाहणाऱ्या ओढ्यांची संख्या भरपूर आहे. जोडीला नागरी वस्ती वाढल्याने नाले, गटारलाईन यांचीही संख्या अधिक आहे.
या पार्श्वभूमीवर खोपोली नगरपरिषद दरवर्षी प्राधान्याने पावसाळ्यात नाले-गटारे तुंबून पूरस्थिती निर्माण होवू नये याकरिता आरोग्य विभाग आणि बांधकाम विभागाच्या माध्यमातून नालेसफाईचे काम करते. शहरातील भानवज – शास्त्रीनगर येथून वाहणाऱ्या ओढ्याची सफाई न झाल्यास भाऊ कुंभार चाळ, गुलशन अपार्टमेंट, विनानगर परिसर, शिळफाटा येथील डिसी नगर आदी भागांमध्ये पावसाचे पाणी साचून पूरसदृश्य स्थिती निर्माण होते.
त्यामुळे येथे सफाई सोबत गाळही काढला जातो. शहरातील सर्वच ठिकाणच्या नालेसफाईसाठी यावर्षी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ, जेसीबी पोकलॅन सारखी यंत्रे वापरून पैसा खर्च करण्यात आला होता. परंतु हा पैसा आता पाण्यात गेला आणि कामाचा दिखावा तुंबला, अशी चर्चा नागरिकांमध्ये होत असून नगरपरिषदेच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे.





