प्रभात वृत्तसेवा पुणे – नगरविकास विभागाच्या आदेशानुसार महापालिकेच्या निवडणूक विभागाने शहराच्या प्रभाग रचनेचे काम पूर्ण केले आहे. येत्या दोन दिवसांत प्रभाग रचना महापालिका आयुक्तांपुढे सादर होईल. त्यानंतर ती नगरविकास विभागास पाठविण्य़ात येणार आहे. २५ जुलै पर्यंत नियमानुसार प्रारूप प्रभाग रचना पूर्ण करण्याचे आदेश शासनाने दिले होते. या कामासाठी नेमलेल्या सदस्यांच्या सह्या ३१ जुलैपूर्वी घेवून ही रचना शासनाकडे पाठविण्यात येईल. रखडलेल्या पालिका निवडणूका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, राज्य शासनाने महापालिकेस प्रभाग रचनेचे काम सुरू करण्याचे आदेश १२ जून रोजी दिले होते. त्यानंतर त्यात बदल करत पुन्हा सुधारीत आदेश २३ जून रोजी दिला. त्यानुसार, प्रारूप प्रभाग रचना करण्यास २५ जुलैची मुदत दिली होती. शासनाच्या आदेशानुसार, पालिका निवडणूकीसाठी ४ सदस्यांचा प्रभाग असणार आहे.या निवडणूकीसाठी २०११ ची लोकसंख्या गृहीत धरण्यात येणार असल्याने पालिकेतील समाविष्ट गावांसाह ही लोकसंख्या ३५ लाख आहे. त्यानुसार शहरात १६५ नगरसेवक असतील. त्यामुळे एक प्रभाग पाच सदस्यांचा अथवा काही प्रभाग ३ सदस्यांचे असण्याची शक्यता आहे.प्रत्यक्षात प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतरच याचे स्वरूप स्पष्ट होईल. आता प्रभाग रचना तयार झाल्याने इच्छुकांनाही निवडणुका होण्याची खात्री वाटत आहे.