दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांची निवड

मुंबई : दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसंस्कृतीचे अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची पुणे येथे झालेल्या बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये डॉ. तारा भवाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
अध्यक्षपदासाठी ‘ही’ नावे होती चर्चेत
दिल्ली येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदासाठी यंदा डॉ. तारा भवाळकर, साहित्यिक बाबा भांड, विश्वास पाटील, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग , निवृत्त सनदी अधिकारी ज्ञानेश्वर मुळे, विचारवंत विनय हर्डीकर, लेखिका मेघना पेठे, समीक्षक वि. स.जोग यांची नावे चर्चेत होती. अखेर आज डॉ. तारा भवाळकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
यापूर्वी 1954 मध्ये दिल्लीत झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी भूषविले होते. आगामी संमेलनासाठी त्याच तोलामोलाचे आणि राष्ट्रीय पातळीवर ओळख असलेल्या साहित्यिकाची निवड करण्याचे आव्हान महामंडळासमोर होते. महामंडळाची बैठक टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेत झाली . शनिवारच्या बैठकीत संमेलनातील कार्यक्रमांची रूपरेषा, ग्रंथ दालनाचे नियोजन आदींवर चर्चा करण्यात आली आणि आजच्या बैठकीत ही रूपरेषा अंतिम करून संमेलनाध्यक्षांची निवड घोषीत करण्यात आली .
डॉ. तारा भवाळकर यांचा परिचय
डॉ. तारा भवाळकर यांच्याविषयी बोलायचे झाल्यास त्यांचा जन्म 1 एप्रिल 1939 रोजी सांगलीमध्ये झाला. त्यांनी लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरासंत साहित्य, एकांकिका लेखन अशा विविध विषयावर विपुल लेखन केले आहे. त्या लोकसाहित्याच्या अभ्यासक म्हणून ओळखल्या जातात. महिलांच्या जाणीव जागृती विषयी त्यांनी लेखन केले आहे. आयुष्यभर संशोधन, लेखन यामध्ये कार्यरत आहेत. वैचारिक लेखन करणाऱ्या लेखिका म्हणूनही त्या परिचित आहेत.





