सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचे माजी प्रमुख डॉ. किरण ठाकूर यांचे निधन

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. किरण ठाकूर यांचे शनिवारी 28 डिसेंबर रोजी पहाटे दुःखद निधन झाले.
सन 2001 ते 2007 या काळात विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. डॉ. ठाकूर यांनी तीन दशकांहून अधिक काळ पत्रकारिता केली. पुणे डेलीमध्ये उपसंपादक आणि युनायटेड न्यूज ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेत प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम पाहिले. इंडियन पोस्ट आणि द ऑब्झर्वर ऑफ बिझनेस अँड पॉलिटिक्स या नियतकालिकांसाठीही त्यांनी काम केले.
डॉ. ठाकूर यांनी 2001 मध्ये अध्यापनाच्या क्षेत्रात प्रवेश केला. पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागात ते प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून रुजू झाले. या काळात विभागाच्या प्रगतीसाठी त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतले आणि नव्या संशोधनांना चालना दिली.
डॉ. ठाकूर यांनी भारतातील वृत्तपत्रांच्या वेब आवृत्त्या या विषयावर पीएचडी संशोधन केले. अनेक शोधनिबंधांबरोबरच न्यूजपेपर इंग्लिश, हँडबुक ऑन प्रिंट जर्नालिझम आदी पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले. 2007 मध्ये विभागातून निवृत्त झाल्यानंतर डॉ. ठाकूर यांनी अहमदाबाद येथील मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन अँड रिसर्च, तसेच फ्लेम आणि विश्वकर्मा विद्यापीठांमध्ये मानद प्राध्यापक म्हणून काम पाहिले.





