Pune : ध्येय, स्वप्ने आणि प्रेमाचा समतोल साधा; विद्यार्थ्यांनी संवेदनशीलता जपावी : डॉ. संजय चाकणे
Pune : पुण्यातील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयात 'शब्दसृष्टी' भित्तीपत्रक आणि 'सृजन' कवी कट्ट्याचे उद्घाटन झाले. यावेळी डॉ. संजय चाकणे यांनी विद्यार्थ्यांना ध्येय, स्वप्ने, प्रेम आणि जीवनमूल्यांचा समतोल साधण्याचा संदेश दिला.

Pune : विद्यार्थीदशेत केवळ प्रेमच नव्हे, तर ध्येय, स्वप्ने आणि जीवनमूल्ये यांचाही समतोल राखणे आवश्यक आहे. जीवनाची भक्कम जाणीव आणि मूल्यांचा पाया मजबूत केल्यानंतरच प्रेमाची खरी अनुभूती घेता येते. तसेच निसर्गापासून समाजापर्यंत प्रत्येक घटकाविषयी प्रेम आणि संवेदनशीलता जोपासल्यास जीवन अधिक समृद्ध होते, असे प्रतिपादन खडकी शिक्षण संस्थेचे सहसचिव तथा प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी केले.
खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय (स्वायत्त) येथील मराठी विभागाच्या वतीने आयोजित ‘शब्दसृष्टी’ या साप्ताहिक भित्तीपत्रकाचे आणि ‘सृजन’ कवी कट्ट्याचे उद्घाटन डॉ. चाकणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.
या कार्यक्रमानिमित्त आयोजित ‘प्रेमाच्या कवितांचे सादरीकरण’ या विशेष उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत प्रेम, निसर्ग, माणुसकी आणि जीवनमूल्यांवर आधारित कविता सादर केल्या. विद्यार्थ्यांच्या प्रभावी सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
कार्यक्रमात आयक्यूएसी प्रमुख डॉ. गौरी माटेकर यांनी ‘शब्दसृष्टी’ आणि ‘सृजन’ या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या साहित्यिक अभिव्यक्तीला प्रभावी व्यासपीठ मिळत असून त्यांच्या सर्जनशीलतेला नवी दिशा मिळत असल्याचे सांगितले. कला शाखेचे उपप्राचार्य प्रा. जे. डी. नाईक यांनी कवितेतून व्यक्त होणाऱ्या प्रेमभावना समाजात संवेदनशीलता आणि संस्कार जपण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात, असे मत व्यक्त केले.
यावेळी वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. सुचेता दळवी, संगणक विज्ञान शाखेचे उपप्राचार्य प्रा. राजेंद्र लेले, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी विभागप्रमुख डॉ. शैलेंद्र काळे यांनी ‘शब्दसृष्टी’ आणि ‘सृजन’ या उपक्रमांची उद्दिष्टे स्पष्ट केली. तर विद्यार्थी कल्याण विभागाचे प्रमुख तथा मराठी विभागाचे प्रा. स्वामीराज भिसे यांनी सूत्रसंचालन केले.





