Rajendra Jaiswal Narmada Swimming Record : शारीरिक तंदुरुस्ती आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कोणतीही गोष्ट साध्य करता येते, हे नागपूरचे रहिवासी डॉ. राजेंद्र जायस्वाल यांनी सिद्ध करून दाखवले आहे. ११ मार्च रोजी त्यांनी नर्मदा नदीमध्ये सलग २५.६५ किलोमीटर अंतराची पोहण्याची स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली. हा पल्ला गाठण्यासाठी त्यांना ८ तास १३ मिनिटे इतका वेळ लागला. नर्मदा नदीतील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा पोहण्याचा प्रयत्न मानला जात आहे. पंतप्रधानांच्या ‘फिट इंडिया’ मोहिमेचा प्रभाव या थक्क करणाऱ्या कामगिरीबद्दल बोलताना डॉ. जायस्वाल म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’ मोहिमेतून मला ही प्रेरणा मिळाली. तरुणांना आरोग्याप्रती जागरूक करणे, नर्मदेची स्वच्छता आणि प्रादेशिक पर्यटनाला चालना देणे हा यामागील माझा मुख्य उद्देश आहे.” मूळचे पिपरिया येथील रहिवासी असल्याने त्यांनी या विक्रमासाठी आपल्या जन्मभूमीची निवड केली. ११ मार्च रोजी डॉ. राजेंद्र जयस्वाल यांनी नर्मदापुरम जिल्ह्यातील पिपरिया परिसरातील सांडिया येथील सीताराम घाट येथून पोहण्यास सुरुवात केली. सकाळी ७ वाजता त्यांनी नर्मदा नदीत प्रवेश करून लांब अंतर पोहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी ८ तास १३ मिनिटे सतत पोहत राहून न थांबता आपला प्रवास सुरू ठेवला. दुपारी ३:१३ वाजता ते मोतिल्सीर घाटावर पोहोचले आणि एकूण २५.६५ किलोमीटर अंतर पोहण्याचे त्यांचे ध्येय पूर्ण केले. या उल्लेखनीय कामगिरीची अधिकृतपणे नोंद करण्यासाठी, आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गुडघ्यांच्या शस्त्रक्रियेलाही दिले आव्हान विशेष म्हणजे, १३ वर्षांपूर्वी डॉक्टरांनी डॉ. जायस्वाल यांना दोन्ही गुडघ्यांच्या शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. मात्र, त्यांनी शस्त्रक्रिया न करता शिस्त आणि नियमित सरावाच्या जोरावर स्वतःला इतके तंदुरुस्त बनवले की, आज ते तरुणांसाठी आदर्श ठरले आहेत. ६२ व्या वर्षी त्यांनी अमेरिकेतील कठीण अशी ‘फुल आयर्नमॅन कॅलिफोर्निया’ स्पर्धा पूर्ण करणारा पहिला भारतीय होण्याचा मानही मिळवला होता. त्यांच्या नावावर १६१ किमी अल्ट्रा मॅराथॉन आणि तिरंग्यासह ८१ किमी धावण्याचे अनेक विक्रम जमा आहेत. हेही वाचा – Hardik Pandya New Car : हार्दिकने खरेदी तब्बल इतक्या कोटींची लक्झरी कार!गर्लफ्रेंड माहिकासोबत नव्या सुपरकारमधून रपेट; पाहा VIDEO पिपरिया येथील जय माता दी समितीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या ऐतिहासिक यशानंतर स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या वतीने डॉ. जायस्वाल यांचा भव्य सत्कार करण्यात आला.