Dr.Prakash Amte : आदिवासींमध्ये तोंडाच्या कर्करोगात वाढ; डॉ. प्रकाश आमटेंनी व्यक्त केली चिंता

नागपूर : देशातल्या दुर्गम आदिवासी भागांमध्ये आरोग्य, शिक्षणासारख्या मुलभूत गरजा उशीराने पोचल्या. मात्र बाजारीकरणामुळे तंबाखू आणि गुटखा लवकरच पोचला. त्यामुळे दुर्गम आदिवासी समुदायांमध्येही मुख कर्करोगाचा विळखा आवळला जात आहे. राना- वनांमध्ये वास्तव्य करणारे तरुणच नाही तर मुली देखील यात गुरफटत असल्याची चिंता रॅमन मॅगेसेसे पुरस्कार विजेते पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली.
नागपूर पोलीस आयुक्तालयातर्फे राबवण्यात येत असलेल्या ऑपरेशन थंडर अंतर्गत श्वेत पत्रिकेचे राष्ट्रीय अग्निशमन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात प्रकाशन करण्यात आले. यावेळी ते डॉ. आमटे बोलत होते. दुर्गम आदिवासी भागांमध्ये दळणवळणाची साधने जरी उशिराने पोचली तरी तंबाखूचे बोट धरून गुटखा, खर्रा आणि विदेशी मद्यही पोचल्याचे नमूद करीत डॉ. आमटे म्हणाले, आदिवासी भागांमधली तरुण पिढी झपाट्याने या व्यसनांच्या विळख्यात गुरफटत आहे. त्यामुळे आदिवासी समुदायांमधील शाळकरी मुलांमध्ये देखील मुख कर्करोगाची प्राथमिक लक्षणे आढळत आहेत. नागपूर पोलिसांनी सुरू केलेल्या ऑपरेशन थंडर सारख्या मोहिमा राज्यातल्या दुर्गम भागातही पोहचवणे तितकेच गरजेचे आहे, अशा शब्दांत डॉ. आमटे यांनी या मोहिमेला प्रोत्साहनाची थाप दिली.
हेमलकसा प्रकल्पातल्या प्रवासाचे अनुभव मांडताना डॉ. आमटे म्हणाले, पिकनिक म्हणून सुरू झालेल्या हेमलकसामध्ये जेव्हा पहिले पाऊल टाकले होते, तेव्हा गरिबी हाच एक रोग होता. आज मागे वळून पाहत असताना रोगांचे पॅटर्न बदलल्याचे जाणवते. लोकबिरादरी प्रकल्पात पहिल्या दिवसापासूनच पैसा नाही म्हणून कधी काम थांबले नाही. या कामातून तयार झालेले गुडविलच आज कामाला येत आहे. त्याचा आनंद चिरकाळ टिकणारा आहे. आदिवासी तरुणांमध्ये कमालीच्या सहनशक्ती क्षमता असते. जंगलाशी नाळ जुळलेल्या आदिवासी समुदायांमधली सुशिक्षित तरुण मुलांपैकी ७० ते ८० टक्के मुले नोकरीसाठी ग्रामीण दुर्गम भागाला प्राधान्य देतात. ही समाधानाची आणि सकारात्मक बाब असल्याचे ते म्हणाले.





