पुणे | डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणाचा निकाल अकरा वर्षांनी लागला. यात आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेप आणि प्रत्येकी पाच लाख रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.
तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याने गुन्ह्याचा कट रचल्याच्या संशयाला वाव असला, तरी ते पुराव्याद्वारे सिद्ध करण्यात सरकार पक्षाला अपयश आल्याचे नमूद करत त्याची मुक्तता करण्यात आली, तसेच अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांचीही पुराव्याअभावी मुक्तता करण्यात आली. विशेष न्यायाधीश पी.पी.जाधव यांनी हा आदेश दिला आहे. आरोपींवर ‘यूएपीए’चे कलम लावताना ‘सीबीआय’च्या तपास अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केल्याचे न्यायालयाने यावेळी ओढले.
डॉ. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास ओंकारेश्वर मंदिराजवळच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर हत्या करण्यात आली. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रारंभी पुणे पोलीस, राज्य दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि नंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या गुन्ह्याचा तपास करून डॉ. वीरेंद्रसिंह तावडे (रा. सातारा),
सचिन अंदुरे (रा. छत्रपती संभाजीनगर), शरद कळसकर (रा. जालना), विक्रम भावे आणि अॅड. संजीव पुनाळेकर (दोघे रा. मुंबई) यांना अटक केली. “तावडे याने खुनाचा कट रचला असून, अंदुरे आणि कळसकर यांनी गोळ्या झाडल्या, भावे याने घटनास्थळाची “रेकी’ केली आणि पुनाळेकर यांनी कळसकरला गुन्ह्यातील शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला,’ असे आरोपपत्र सीबीआयने विशेष न्यायालयात दाखल केले.
त्यानुसार दि. १५ सप्टेंबर २०२१ रोजी पुण्याच्या विशेष न्यायालयाने पाचही आरोपींवर आरोप निश्चित केले. आरोपींनी गुन्हा नाकबूल केल्याने प्रारंभी न्यायाधीश एस. आर. नावंदर आणि नंतर न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या विशेष न्यायालयाने या खटल्याची सुनावणी घेतली.
सीबीआयतर्फे वीस साक्षीदारांची साक्ष विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी नोंदविली. बचाव पक्षातर्फे अॅड. प्रकाश साळशिंगीकर, अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अॅड. सुवर्णा आव्हाड यांनी सरकार पक्षाच्या साक्षीदारांची उलटतपासणी घेत, बचाव पक्षातर्फे दोन साक्षीदारांची साक्ष नोंदविली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर न्यायालयाने निकाल जाहीर केला.





