डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांचा पंधरा राज्यांत जागर; हत्येला बारा वर्षे

प्रगती जाधव पाटील / सातारा : अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजाला विवेकवादी विचारांची देणगी देणार्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मृत्यू पश्चात त्यांचे विचार महाराष्ट्राबाहेरही रूजू लागले आहेत. विज्ञानाच्या प्रचार आणि प्रसाराचे काम करणार्या ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्कच्यावतीने देशातील सुमारे १५ राज्यांमधील संस्थांनी विज्ञानवादाबरोबरच अंधश्रध्दा निर्मूलनाचे कामही जोमाने सुरू केले आहे.
दाभोलकर यांची हत्या करून त्यांचे विचार संपविण्याचे स्वप्न पाहणार्यासाठी विवेकवादींचे हे कृतीशील उत्तर असून हजारो कार्यकर्ते या माध्यमातून जोडले जात आहेत. नागरिकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन अनिष्ठ प्रथा, परंपरा समाजाला पोखरण्याचे काम करत होत्या. या अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचे काम समितीच्या माध्यमातून दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी हाती घेतले. तरुण पिढीला वैज्ञानिक दृष्टीकोन देत असताना प्रत्येक कृतीला, घटनेला विज्ञानाची जोड देणे, ती विज्ञानाच्या फुटपट्टीने तोलण्याची शिकवण दिली. ही चळवळ हळूहळू राज्यभर पसरली. आता त्यांच्या विचारांचा जागर १५ राज्यांमध्ये सुरू आहे.
पुस्तकांचेही होतेय भाषांतर
अंधश्रध्दा निर्मूलनाचे काम सुरू केल्यानंतर ठरलं डोळस व्हायचं, प्रश्न तुमचा उत्तर दाभोलकरांचे, लहे अंधश्रध्देचे, श्रध्दा अंधश्रध्दा, तिमिरातूनही तेजाकडे, अंधश्रध्दा प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम, भ्रम आणि निरास, विचार तर कराल? या पुस्तकांचे लेखन डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी केले आहे. या पुस्तकांतील काही अंशांचे प्रांतवार भाषेत भाषांतर करून त्याचे वितरण करण्यात आले.
विचार विस्ताराची ही कारणे
धर्माच्या नावाखाली सुरू असलेल्या अंधश्रध्देवर घाला घालताना डॉ. दाभोलकर यांनी कायम कायद्याचा आणि संविधानाचा आधार घेतात. लोकांच्या मनातील अंधश्रध्दा दूर करण्यासाठी त्यांनी त्यांच्यासमोर विज्ञानाचे प्रयोग केले, चमत्कार दाखवा आणि पाच लाख जिंका, त्यांची ही योजना तर अनेकांवर भारी पडली. अन्य राज्यांत दाभोलकर विचारांचा विस्तार होण्यामागे ही काही कारणे मानली जातात.
दाभोलकरांचे विचार पोहचले या राज्यात
आसाम, पश्चिम बंगाल, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, झारखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली, केरळ, तमिळनाडू, ओरिसा, बिहार
धर्माच्या मुळाशी अंधश्रध्दा नांदते. लोकांच्या श्रध्देला धक्का न लावता अंघश्वध्देचे समूळ उच्चाटन करण्याची अनोखी पध्दत डॉ. दाभोलक यांची होती. त्यांच्या हत्येनंतर ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्कमधून देशभरात त्यांच्या विवेकी विचारांचा जागर केला जातो. दरवर्षी यात काही राज्यांची भर पडत आहे. यंदा १५ ऑगस्टपासून तब्बल १५ राज्यांमध्ये दाभोलकर विवारांचा जागर सुरू आहे.
डॉ. हमीद दाभोलकर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती





