डॉ. दाभोलकर खूनप्रकरण; मारेकरी सापडले, सूत्रधार कधी पकडणार?

पुणे – “डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाला दि. 20 ऑगस्टला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. उच्च न्यायालयाने अनेक वेळा फटकारल्यानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या संशयित मारेकऱ्यांना सीबीआयने अटक केली होती. त्यांच्यावर खटला देखील सुरू आहे. पण, या खूनामागचे सूत्रधार अजून फरारच आहेत. त्यांना कधी पकडणार?’ असा सवाल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पत्रकार परिषदेत केला.
यावेळी अंनिसचे नंदीनी जाधव, श्रीपाल ललवानी आणि डॉ. हमीद दाभोलकर आदी उपस्थित होते.
डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या खुनाच्या तपासातून आणि आजपर्यंत दाखल झालेल्या आरोपपत्रांच्यामध्ये हे चारही खून एका सामाईक उद्दिष्टाने आणि एकाच विशिष्ट कट्टरपंथीय संघटनेच्या लोकांकडून झाल्याचे पुढे आले आहे. असे असतानाही शासन या संघटनेविषयी ठोस कारवाई करताना दिसत नाही, हे निषेधार्ह आहे.
डॉ. दाभोलकरांच्या संशयित मारेकऱ्यांचे त्यांच्याशी कोणतेही वैयक्तिक वैर नव्हते. केवळ त्यांच्या विचारांना विरोध करण्यासाठी भडकावले गेल्यामधून हा खून करण्यात आल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. अशा पार्श्वभूमीवर मारेकऱ्यांइतकेच त्यांची डोकी नियोजनबद्ध पद्धतीने भडकवणारे सूत्रधारदेखील जबाबदार आहेत, असे अंनिसने म्हटले. या सूत्रधारांना लवकर पकडून त्यांना कठोर शासन करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, दाभोलकरांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.





