मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी अभिनेत्री कंगना राणावतच्या भिकेच्या वक्तव्याचे समर्थन केले होते. त्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात येत आहे. तसेच, गोखले यांनी राजकीय भूमिकांवरही भाष्य केले होते. त्यानंतर मराठमोळा परफेक्शनिस्ट अभिनेता अतुल कुलकर्णी यांनीही एका वाक्यातून त्यांच्यावर निशाणा साधला. आता, अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही गोखलेंना चांगलेच सुनावले आहे. “कोणी म्हणत असेल हा देश भगव्याचा आहे हिरव्याचा नाही. मग, रुग्णालयात पेशंट मरत असेल, त्याला रक्ताची गरज असेल. तेव्हा तुम्ही म्हणाल का, हा पेशंट मरू द्या, त्याला भगव्याचं रक्त असेल तरच देणार, जर हिरवा असेल तर त्याला हिरव्याचंच रक्त देणार?” असा प्रश्न अमोल कोल्हे यांनी विचारला. तसेच, मानवता हीच त्यापलिकडची गोष्ट आहे, वसुदैवं कुटुंबकम ही आपल्या संतांची शिकवण, परंपरा आहे. एकीकडे तुम्ही संस्कृतीचे गोडवे गात असताना दुसरीकडे वसदैवं कुटुंबकमला तिलांजली देता, असे म्हणत अमोल कोल्हे यांनी अभिनेता विक्रम गोखलेंना प्रत्युत्तर दिले आहे. आज मराठी माणूस भरडला जात आहे. सध्याचे सरकार हे चुकलेले गणित आहे, अशी टीका ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी महाआघाडी सरकारवर केली. हे गणित सुधारण्याची अजूनही वेळ गेलेली नाही. देश संकटाच्या उंबरठ्यावर असताना भाजप व शिवसेनेने एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच, सध्या हिंदूंमध्ये जाणीवपूर्वक तेढ वाढवली जात आहे. आपण हे उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. तरुणाईला गाफील ठेवण्यासाठी इतिहास बदलण्याचे षडयंत्र चालू आहे. या दुष्कृत्यांना आळा घालण्याची वेळ आली आहे. माझा देश भगवाच राहील, हिरवा कधीही होणार नाही, असे गोखले यांनी म्हटले. तर, कंगनाने देशाच्या स्वातंत्रतेबद्दल केलेल्या विधानाचेही त्यांनी समर्थन केलं आहे. त्यामुळे, ते सध्या नेटीझन्सच्या निशाण्यावर आहेत.