डॉ.आंबेडकर महाविद्यालयाला नॅकची ‘बी प्लस’ श्रेणी

पुणे – पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या येरवडा येथील डॉ.आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेने (नॅक) शैक्षणिक मूल्यांकनात ‘बी प्लस’ श्रेणी प्रदान केली आहे. यामुळे महाविद्यालयाच्या नावलौकीकात आणखीच विशेष महत्वाची भर पडली आहे.
नॅक मूल्यांकन समितीने ९ व १० सप्टेंबरला महाविद्यालयाला भेट देवुन पाहणी व तपासणी केली होती. त्यात शैक्षणिक प्रक्रियेत संस्थेची कामगिरी, अभ्यासक्रमाची निवड आणि अंमलबजावणी, शैक्षणिक दर्जा आणि मूल्यमापन, विद्यार्थ्यांचे निकाल, संशोधन कार्य आणि प्रकाशन, मूलभूत सुविधा आणि संसाधनांची स्थिती, संस्था, प्रशासन, आर्थिक स्थिती आणि विद्यार्थी सेवा आदींचा समावेश होता.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.गौतम बनसोडे, आयक्युएसी समन्वयक प्रा.डॉ.रुपेश थोपटे यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या भरीव योगदान व कामगिरीमुळे महाविद्यालयाला नॅक मुल्यांकनाच्या तिसऱ्या फेरीमध्ये (थर्ड सायकल) ‘बी प्लस’ श्रेणी प्राप्त झाली आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, सचिव संजीव बोधनकर, उपाध्यक्ष डॉ. डी.जी.देशकर, माजी प्राचार्य डॉ. सोमनाथ नजन, डॉ. नितीन बिरमल, डॉ. मनोज पांडकर यांच्या मार्गदर्शन व सहकार्याचा लाभ महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी सतत होतो.





