डीपी रस्त्यांमुळे वाहतूककोंडी कमी होईल – मंत्री उदय सामंत

पुणे : हडपसर मतदारसंघात होत असलेली ही विकासकामे जनतेच्या जीवनात शिवसेनेच्या माध्यमातून होणाऱ्या विकासाचेच द्योतक आहे. उपमुख्यमंत्री लोकनेते एकनाथ शिंदे यांच्या स्पष्ट दृष्टीकोनामुळे आणि जनतेशी बांधिलकीमुळेच हा वेगवान विकास शक्य झाला आहे. डीपी रस्त्यांच्या माध्यमातून हडपसर मतदारसंघातील वाहतूककोंडी कमी होण्यासाठी मदत होईल. हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि आपण तो पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन मराठी भाषा कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी केले.
हडपसर मतदारसंघातील अंतर्गत डीपी रस्ते व विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा हडपसरमधील रहेजा चौक येथे मंत्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास भाऊ तुपे, उद्योजक बाळासाहेब भानगिरे, माजी स्वीकृत नगरसेवक राकेश झांबरे, स्वाती टकले, उपजिल्हाप्रमुख अमर घुले, अभिमन्यू भानगिरे, सचिन तरवडे, सचिन भानगिरे, सिद्धांत भानगिरे, सुदर्शना त्रिगुनाईत, सारिका पवार, श्रुती नाझिरकर, श्रद्धा शिंदे, सुरेखा पाटील, सोनाली लांडगे यांच्यासह हडपसर मतदार संघातील पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे म्हणाले की, हडपसरच्या नागरिकांसाठी पुणे शहरात जाण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या रस्त्यांच्या लोकार्पणामुळे परिसरातील वाहतूक कोंडी लक्षणीय प्रमाणात कमी होणार आहे. स्थानिक व्यवसाय, शाळा, आरोग्य सुविधा आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीवनमानात मोठा बदल होणार आहे. महानगरपालिकेच्या पातळीवर ही कामे अनेक वर्षे रखडलेली होती. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाखाली ही कामे करता आली. सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि प्रशासनाशी थेट समन्वय साधून घेतलेल्या पुढाकारामुळे ही कामे विक्रमी वेगाने पूर्ण झाली. “२ वर्षांत जे शक्य झाले, ते २० वर्षांतही झाले नसते,” असे त्यांनी सांगितले.





