Israeli strikes in Gaza : इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझामध्ये डझनभर ठार !
गाझा पट्ट्यामध्ये इस्रायलने गेल्या दोन दिवसात केलेल्या हवाई हल्ल्यात किमान डझनभर लोक ठार झाले आहेत. बुधवारी मध्य गाझामध्ये एकाच कुटुंबातील तीन सदस्य ठार झाले.

Israeli strikes in Gaza : गाझा पट्ट्यामध्ये इस्रायलने गेल्या दोन दिवसात केलेल्या हवाई हल्ल्यात किमान डझनभर लोक ठार झाले आहेत. बुधवारी मध्य गाझामध्ये एकाच कुटुंबातील तीन सदस्य ठार झाले.
तर मंगळवारी, उत्तर गाझामधील दाट लोकवस्तीच्या जबालिया निर्वासित छावणीतील पोलीस ठाण्यावर झालेल्या हवाई हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये एका महिलेसह सहा पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश होता.
दक्षिणेकडील खान युनिस येथील तंबूंच्या छावणीवर झालेल्या बॉम्बहल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, अशी माहिती नासेर रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसेच, सर्वात दक्षिणेकडील राफा शहराबाहेरील मुवासी परिसरात इस्रायली सैनिकांनी गोळ्या झाडून एका मुलाला ठार केले, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
मध्य आणि दक्षिण गाझामधील हल्ल्यांवर इस्रायली लष्कराने तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. जबालियामधील हल्ल्यासंदर्भात ठार झालेल्या चार पोलीस अधिकाऱ्यांपैकी काही जण हमासचे दहशतवादी होते, असा दावा इस्रायलच्या निवेदनात केला गेला आहे.
ठार झालेल्या अधिकाऱ्यांपैकी एक, कर्नल मोहम्मद मारवान सालेम, हे वरिष्ठ पोलीस कमांडर आणि जबालिया पोलीस ठाण्याचे प्रमुख होते, असे हमासच्या गृह मंत्रालयाने सांगितले. पण पोलीस जर दहशतवाद्यांना मदत करत असतील, तर ते लक्ष्य करण्यायोग्य असल्याचे इस्रायलने म्हटले आहे.





