Dowry Victim : ‘ति’च्या विश्वासाचा घुसमटतोय ‘श्वास’…!

– अजय उभे
मागच्या काही दिवसांपासून वैष्णवी हगवणे कथित आत्महत्या प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. तिने सासरच्या जाचाला (Dowry Victim) कंटाळून आपल्या आयुष्याचा शेवट केला. आता तिने आत्महत्या केली कि तिची हत्या करण्यात आली हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. कुणी म्हणतंय तिने आत्महत्या केली तर कुणी म्हणतंय तिची हत्या करण्यात आली. पण खरं काय आहे ते लवकरच समोर येईल असो.. आपण या लेखात एका वेगळ्या विषयावर (Dowry Victim) बोलणार आहोत. त्याअगोदर वैष्णवी हगवणे प्रकरण काय आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया…
काय आहे वैष्णवी हगवणे प्रकरण ?
वैष्णवी हगवणे या राष्ट्रवादीचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्या सून होत्या. 16 मे रोजी वैष्णवी हगवणे यांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जात होतं. मात्र त्यांच्या शरीरावर व्रण आढळल्यानं तिच्या पालकांनी वैष्णवीची हत्या झाल्याचा आरोप केला.वैष्णवी हगवणे आणि शशांक हगवणे यांचा 28 एप्रिल 2023 रोजी प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर सासरच्या लोकांकडून तिला वारंवार त्रास दिला जात होता. वैष्णवीचे वडिल अनिल कस्पटे यांनी लग्नाच्या वेळी 51 तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी आणि सासरच्यांनी सूचवलेल्या कार्यालयात लग्न लावून दिले होते. मात्र, तिचे सासू, सासरे आणि नवरा यांनी लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच तिच्याशी भांडणं करायला सुरुवात केली.लग्नाच्या चार ते पाच महिन्यानंतर वैष्णवीच्या सासू लता हगवणे यांनी चांदीच्या भांड्यांची मागणी केली. ती दिली नाहीत म्हणून तिला त्रास देणे सुरू होते. तसेच वैष्णवी गरोदर असताना तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करण्यात आली.
यानंतर 27 नोव्हेंबर 2023 मध्ये वैष्णवीनं आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारानंतर ती पुन्हा सासरी रहायला गेली होती. मात्र, त्यानंतर 15 दिवसांनी वैष्णवीचे पती शशांक हगवणेंनी जमीन खरेदी करण्यासाठी 2 कोटी रुपयांची मागणी केली. ही रक्कम देऊ न शकल्याने पुन्हा वैष्णवीला त्रास देत तुला फुकट पोसणार आहे का? तुझ्या खानदानाचा काटा काढतो, अशी धमकी दिली. यानंतर तिला मारहाण करून पुन्हा माहेरी सोडण्यात आले. 5 मे 2025 ला वैष्णवी तिच्या चुलत भावाच्या लग्नासाठी माहेरी आली होती तेव्हा जावयाला पोशाख आणि अर्धा तोळ्याची अंगठी दिली. यातला पोशाख फेकून ते निघून गेले आणि वैष्णवीला माहेरी थांबू द्यायलाही त्यांनी नकार दिला. 16 मे रोजी वैष्णवीच्या नातलगांना फोन करून तिला माहेरी न्यायला सांगा असे शशांक यांनी कळवले. तसेच संध्याकाळी याच नातलगांना वैष्णवीनं आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी वैष्णवीचे सासरे, सासू, नंणद, नवरा आणि दीर यांना अटक केली आहे. एकंदरीत हे सगळं असे प्रकरण आहे.
वैष्णवीची हत्या कि आत्महत्या?
मीडियाने हे प्रकरण उचलुन धरल्यामुळे मोठ्या प्रमाणात समोर आले. नाहीतर हे प्रकरण राजकीय दबावाखाली दडपण्यात आले असते. धक्कदायक म्हणजे या प्रकरणानंतर अनेक गोष्टी समोर आल्या. विशेष म्हणजे वैष्णवीचा जेव्हा शवविच्छेदन अहवाल आला तेव्हा त्यामध्ये तिच्या शरीरावर धारदार वस्तूनं वार केल्याच्या खुणा आणि अनेक जखमा आढळून आल्या. त्यामुळे तिने आत्महत्या केली तिची हत्या झाली? याचा तपास सुरु आहे.
विश्वासाने घोटला गळा
या सगळ्यात वैष्णवणीच्या मृत्यूला जबाबदार आहे तो विश्वास. हो तिने ठेवलेला विश्वास आणि याच विश्वासाने तिचा गळा घोटला. वैष्णवीचे शशांकवर खूप प्रेम होते. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या लग्नाला वैष्णवीच्या आई – वडिलांचा विरोध होता. मात्र मुलीच्या हट्टापुढे त्यांना झुकावे लागले आणि त्यांनी या लग्नाला होकार दिला. आपल्या मुलीचे चांगले व्हावे असे प्रत्येक आई – वडिलांना वाटते. त्यामुळे त्यांनी वैष्णवीच्या लग्नात कोणतीच कसर सोडली नाही. तिच्या सासरच्यांना ५१ तोळे सोने, चांदीची भांडी, फॉर्च्युनर गाडी असा भरमसाठ हुंडादेखील दिला. वैष्णवीने आईवडिलांच्या विरोधाला डावलून शशांकवर अतिविश्वास ठेवला आणि इथेच तिचा घात झाला.
मर्यादा ओलांडणाऱ्या अपेक्षा
एकंदरीत पाहता या सगळ्याला वाढत्या अपेक्षा कुठेतरी जबाबदार आहेत. आजकाल तुम्ही पहिले तर मुला – मुलींच्या अपेक्षा वाढताना दिसत आहेत. प्रत्येकजण आपली प्रतिष्ठा जपताना दिसत आहे. उदा. एखादी मुलगी कमवत असेल तर तिला आपल्यापेक्षा जास्त कमावणारा मुलगा पाहिजे. जर मुलगा चांगला कमवत असेल तर मुलीच्या घरच्यांना त्या मुलाच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतात. वैष्णवीच्या प्रकरणातदेखील तसेच झाले. वैष्णवीच्या वडिलांनी लग्नाच्या वेळी 51 तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी आणि सासरच्यांनी सूचवलेल्या कार्यालयात लग्न लावून दिले होते. एवढं करूनदेखील वैष्णवीच्या सासरच्या लोकांच्या अपेक्षा वाढतच चालल्या होत्या. आपल्या समाजात अशा कितीतरी वैष्णवी आहेत ज्या अजूनही सासरच्या लोकांचा जाच सहन करत आहेत.
सध्याच्या परिस्थीतीवर बोलायचे झाले तर याच अपेक्षांपायी अनेक मुला – मुलींची लग्ने रखडली आहेत तसेच अनेक नाती तुटली आहेत. जावयाची अपेक्षा पूर्ण केली नाही म्हणून मुलीला नांदवण्यास नकार, सुनेने माहेरच्या लोकांकडून पैसे आणले नाही म्हणून सुनेचा छळ, मुलगा होत नाही म्हणून बायकोचा छळ या सगळ्याला वाढत्या अपेक्षाच जबाबदार आहेत. अपेक्षा ठेवणं काही वाईट नाही पण त्या अपेक्षांना कुठेतरी मर्यादा असावी. जर तुम्ही एखाद्या नात्याकडून अपेक्षा ठेवल्या तर ते नातं न राहता एक व्यवहार बनतो आणि व्यवहाराला कोणतीच मर्यादा नसते.
या सगळ्यामध्ये जास्त बळी जातात ते मुलींचे. तुम्ही कधी ऐकले आहे का कि हुंड्यापायी एखाद्या मुलाने आत्महत्या केली नाही ना… पण याच हुंड्यापायी (Dowry Victim) कितीतरी मुलींनी आत्महत्या केल्याचे आपण ऐकले आहे. या सगळ्यांना मुलगा आणि त्याच्या घरचे जबाबदार आहेत तेवढेच ती मुलगी आणि तिच्या घरचेदेखील जबाबदार असतात. हुंडा देणे आणि घेणे हा गुन्हा असूनदेखील अनेक खेडेगावांमध्ये ही प्रथा सुरु आहे आणि याच प्रथेपायी अनेक मुलींचा जीव जात आहे. सासर आणि माहेर या दोघांचा ताळमेळ बसवताना कुठेतरी ‘ती’चादेखील श्वास घुसमटताना दिसत आहे.





