Dowry Harassment : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; सक्तीने गर्भपात केल्याचा खळबळजनक आरोप – सासरच्या छळाला कंटाळून सोरतापवाडी येथे विवाहित तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.दिप्ती रोहन कारभारी चौधरी असे आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणीचे नाव असून दिप्तीच्या आई हेमलता बाळासाहेब मगर यांनी उरुळी कांचन ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पती रोहन कारभारी चौधरी, सासु सुनिता कारभारी चौधरी, सासरे कारभारी चौधरी, दीर रोहीत कारभारी चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोरतापवाडी येथे सुनिता कारभारी चौधरी आपल्या कुटुंबासह राहत आहेत. दीप्ती रोहन चौधरी व रोहन चौधरी यांचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला होता. माहेरुन चार चाकी गाडी घेण्यासाठी पैशांची मागणी होत होती. तसेच जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडून वारंवार मानसिक व शारीरिक छळ केला जात असे. त्यामुळे सासरच्या सतत होणार्या छळाला कंटाळून दिप्ती रोहन चौधरी हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास उपविभाग पोलीस अधिकारी बापूराव दडस,पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कांबळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिर हे करीत आहेत.