बारामती, – माझी आई आता 87 वर्षांची आहे. तिला सभेला आणणे कितपत योग्य होते, हे मला समजत नाही. तिथे वाचलेले पत्र तिनेच लिहिले असावे का याबद्दल मी साशंक आहे. कारण मी सुद्धा तिचाच मुलगा आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू व मविआचे उमेदवार युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांनी व्यक्त केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रचार सांगता सभेत आई आशाताई यांना आणण्यात आले. ती त्यांची आई आहे तशी माझीही आई आहे. आईनेच ते पत्र लिहिले का याबद्दल मला शंका आहे. आम्हाला कधी 20-25 वर्षांत पत्र लिहिले नाही. ते तिने लिहिले असेल का, असा सवाल त्यांनी केला. तिच्या आजाराबाबत अजित पवार यांनी सभेत माहिती दिली. तिची ट्रिटमेंट सुरू आहे. ती थांबवून तिला आठ दिवसांसाठी इथे आणले गेले. ठिक आहे, तिला ते 25 तारखेनंतर पुन्हा ट्रिटमेंटसाठी नेतील. मी तर अशा परिस्थितीत तिला असा आग्रह केला नसता. मी तिला भेटलो होतो तेव्हा ती मला म्हणाली की मी दमलीय रे, कंटाळली आहे या आजारपणाला. मला दोन पावले सुद्धा चालता येत नाहीत. तुला सभेला नेतील अशी विचारणाही मी केली होती, पण मी हलू शकणार नाही, असे ती म्हणाली होती. पण सोमवारच्या सभेत ती दिसल्याने मला आश्चर्य वाटले. सहाजिकच या वयात व्यक्ति परावलंबी असतो, तुम्ही बाकीचे समजून घ्या असे ते म्हणाले. श्रीनिवास पवार म्हणाले की, अजित पवारांसोबत असलेल्या बहिणींबाबत ते म्हणाले, माझे आणि मोठ्या बहिणीचे काही बोलणे झालेले नाही. आमची मोठी बहिण दादाचा व्यवसाय बघते. दादाच्या केसेस चालल्या आहेत, त्या ती बघते, असे त्यांनी नमूद केले. आम्ही काही चूक केली नाही शरयू मोटर्समध्ये रात्री सुरक्षारक्षक असताना पाच-सहा अधिकारी आले. त्यांनी तपासणी केली. सुरक्षारक्षक व्हीडिओ चित्रीकरण करू लागला तेव्हा त्याला रोखले. आमच्या वकीलांनी मंगळवारी (दि. 19) निवडणूक अधिका-यांकडे चौकशी केली, तेव्हा त्यांनी तक्रारीच्या अनुषंगाने तपासणी झाल्याचे सांगितले. पण तक्रार कोणाची होती, हे सांगितले नाही. यासंबंधी आम्हाला काही कल्पना नव्हती. येथे आम्ही व्यवसाय करतो. त्याचा रितसर कर भरला जातो. नटराज कलादालनाचीही तपासणी झाल्याचे निदर्शनास आणून दिले असता, शरयू मोटर्स हे उमेदवाराशी संबंधित आहे, नटराज उमेदवाराशी संबंधित नाही, असे ते म्हणाले. ठिक आहे, भाजपची ती नितीच आहे, पण आम्ही काही चुकीचे केलेले नाही, त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही, असे ते म्हणाले. शरयू मोटार्समध्ये सोमवारी रात्री तिथे पथक आले होते. तिथे आमचा व्यवसाय आहे. तिथे त्यांना काही मिळाले नाही. आम्ही कायदा पाळणारे लोक आहोत. तक्रार कोणी केली याची माहिती नाही. जोपर्यंत सगळी माहिती मिळत नाही तोपर्यंत याबाबत बोलणं योग्य नाही. पण आम्ही कायद्याने या गोष्टीला सामोरे जाण्यास तयार आहोत. – युगेंद्र पवार, उमेदवार, मविआ, बारामती