nagar | रोजगार हमीवरील मजुरांच्या संख्येत दुप्पटीने वाढ

नगर (प्रतिनिधी) – दुष्काळी परिस्थिती असल्याने यंदा रोजगार हमीवरील मजूरांची संख्या दुप्पटीने टिकून आहे. मागील वर्षी याच कालावधीत मे महिन्यांत जिल्ह्यात ८ हजार ९८९ मजूर रोहयोवर होते. यंदा हा आकडा १७ हजार १४६ झाला असून वाढलेले उन्ह आणि लोकसभा निवडणुकीचा कोणताच परिणाम रोहयोच्या कामांवर दिसत नसून पोटासाठी ग्रामीण भागात मजूरांची रोजगार हमीलाच पंसती असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि महसूल यंत्रणेची १ हजार ९७१ कामे सुरू असून त्याठिकाणी १७ हजार १४६ मजूरांची उपस्थिती आहे.
जिल्ह्यात मागील पावसाळ्यात पर्जन्यमान कमी झाल्यामुळे ऑगस्ट २०२३ ला राज्य शासनाने नगर जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती घोषित केली होती. खरीप हंगाम पावसाने ताण दिल्याने शेतकर्यांच्या पदरी निराश पडली. यामुळे प्रशासनाने मध्यम हंगाम खरीप हंगाम पिका विम्याची २५ टक्के रक्कम अग्रमी देण्याचे आदेश विमा कंपन्यांना दिले.
त्यानंतर परतीचा पाऊस होवून रब्बी हंगामात पिके साधतील, अशी अपेक्षा शेतकर्यांना होती. मात्र, परतीच्या पावसाने हात दाखवल्याने शेतकर्यांच्या पदरी निराश पडली. रब्बी हंगामात शेतीसाठी पाणी नसल्याने उन्हाळ्यात ग्रामीण भागात शेतीचा विषय संपल्याने शेत मजूरांना रोहयोशिवाय रोजगाराचा पर्याय नसल्याचे चित्र आहे.
यामुळे जिल्ह्यात गेल्या महिनाभरात उन्हाचा कडाका वाढत असतांना पारा ४० अशांच्या पुढे असतांना शाश्वत रोजगारासाठी मजूरांची रोहयोला पहिली पंसती असल्याचे दिसत आहे. यामुळे आजही ग्रामीण भागाम रोहयोवरील मजूरांची संख्या टीकून आहे. जिल्ह्यात सध्या रोहयोतून घरकुल, सिंचन विहिरी, पाणंद रस्ते, गुरांचे गोठे, रोपवाटिका, वृक्ष संगोपन यासह व्यक्तीगत लाभाच्या अनेेक योजना, शौचालय आदींचीकामे सुरू आहेत.
रोहयोअंतर्गत जिल्ह्यात गावपातळीवर मजुरांकडून कामांची मागणी प्राप्त होताच तातडीने कामे उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी जिल्ह्यातील तहसीलदार व पंचायत समितींच्या गटविकास अधिकार्यांना दिले आहेत. तालुकास्तरावरील संबंधित अधिकारी व कर्मचार्यांच्या बैठका घेऊन रोहयो कामांची गती वाढविण्याच्या सूचनाही जिल्हाधिकार्यांनी दिल्या आहेत.
तालुकानिहायक कामे कंसात मजूर
अकोले ४८१ मजूर-२१२ कामे, जामखेड ८ हजार ८०० मजूर-७४२ कामे, कर्जत ४५४ मजूर-६२ कामे, कोपरगाव १८९ मजूर-६५ कामे, नगर ३८३ मजूर-५५ कामे, नेवासा १६५ मजूर-३५ कामे, पारनेर १ हजार ९२ मजूर-७४ कामे, पाथर्डी ८९४ मजूर- १०७ कामे, राहाता १५४ मजूर- ४९ कामे, राहुरी २२३ मजूर- ५८ कामे, संगमनेर १ हजार ७६- २०३ कामे, शेवगाव २ हजार ५८३- २५७ मजूर, श्रीगोंदा ६६८ मजूर- ११७ कामे, श्रीरामपूर ८४ मजूर- २६ कामे असे आहेत.





