Baramati News – बारामती तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये वाढत्या उन्हामुळे शेतकरी त्रस्त आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे विहिरी, कुपनलिका, तळी ओढे आटू लागले असून शेत सिंचन पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकरी, नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. बारामती पंचायत समितीच्या प्रशासनावर वाढता ताण येणार आहे. त्यापूर्वीच प्रशासनाने व्यापक पद्धतीने उपाययोजना राबविण्याची मागणी होत आहे. बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील मोरगाव, तरडोली, पळशी, मासाळवाडी, मोढवे, माळवाडी, बाबुर्डी, काऱ्हाटी या सर्व परिसरामध्ये तप्त व वाढत्या उन्हामुळे कुपनलिका, विहिरी, नदी, नाले आटून कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे कृषीसिंचनाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ऊस पिक पाण्याअभावी जळू लागले आहे. परिणामी शेतीसाठी पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. भाजीपाला, मका, कडवळ, उसाला पाणी कमी पडू लागले असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. अद्याप अडीच महिन्यांचा कालावधी हा उन्हाळ्याचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणीटंचाईची समस्या भेडसावणार आहे. पश्चिम भागातील रब्बी हंगामातील ज्वारी व गहू पीक पूर्ण झाले आहे. हंगाम पूर्ण झाला आहे. मात्र, हिरव्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या पिकांना पाणी देता येत नसल्याने जळू लागली आहेत. शेतकरी अवकाळी पावसाची मागणी वाट पाहत आहे. मोरगाव प्रादेशिक योजनेतून पिण्याचे पाणी सध्यातरी सर्व गावांना पोहोचत असून आहे. याबाबत तीव्र पाणीटंचाई जाणवत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.