सातारा – तरडगाव, ता. फलटण येथील दुहेरी खून प्रकरणातील संशयित महिलेला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 12 तासांच्या आत अटक केल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, तरडगावनजीकच्या भुरकवाड, ता. फलटण या गावच्या हद्दीत फिर्यादी छाया नमन्या पवार यांच्या घराजवळ नमन्या आचल पवार व त्यांची बहीण आशाबाई भोसले दि. 22 रोजी 6 वाजण्याच्या सुमारास गप्पा मारत बसले असता, आमच्यावर चोरीचा आळ का घेतला, असे विचारून संशयितांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन हातातील लाकडी भाल्याने आशाबाई भोसले यांच्या गळ्यावर वार करून आणि नमन्या पवार यांच्या पोटात भोसकून त्यांना गंभीर जखमी केले होते.
त्यातच या दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी छाया पवार यांनी दि. 23 रोजी सायंकाळी उशिरा दिलेल्या फिर्यादीवरून फलटण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना संशयितांचा शोध तातडीने घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सर्जेराव पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांच्या अधिपत्याखाली पोलीस पथक तयार केले. त्यांच्यासमवेत घटनास्थळाची पाहणी केली. पोलीस पथकाने घटनेच्या साक्षीदारांकडून माहिती घेतली.
त्यावेळी संशयित पवारटेक (महादेवनगर) परिसरात झुडुपांमध्ये लपल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने तेथे सापळा रचून या गुन्ह्यातील सहभागी असलेल्या संशयित महिलेला लोणंद पोलीस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ताब्यात घेतले. पोलिसांनी संशयित महिलेची कसून चौकशी केली असता पती व इतर काही जणांनी मिळून हा गुन्हा केल्याची कबुली तिने दिली.
या गुन्ह्यातील उर्वरित संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रसन्न जऱ्हाड, हवालदार तानाजी माने, विजय कांबळे, शरद बेबले, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, विशाल पवार, मोहसीन मोमीन, विक्रम पिसाळ. राज ननावरे, नितीन भोसले, संजय जाधव, लोणंद पोलीस ठाण्याच्या महिला हवालदार धायगुडे यांनी ही कारवाई केली. तेजस्वी सातपुते यांनी त्यांचे अभिनंदन केले.