Crime News : पानवडीत दुहेरी हत्याकांडाचा उलगडा
Crime News : संशयित आरोपी सातारा महामार्गाच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. पुणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने राजगड हद्दीत नाकाबंदी केली. संशयित आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

सासवड : पुरंदर तालुक्यातील पानवडी येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यात सासवड पोलिसांना यश आले. पती-पत्नीच्या हत्येच्या घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत संशयित आरोपीचा शोध घेतला. अखेर पुणे-सातारा महामार्गावर पाठलाग करून संशयित आरोपीला जेरबंद केले. सासवड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाचे कौतुक अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार यांनी केले.
पानवडी येथे (दि.२५) रोजी सायंकाळी एका महिलेला मारहाण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यात मोहन धिवार (वय ८५) आणि त्यांची पत्नी रत्नमाला मोहन धिवार (वय ७५) यांच्यावर हल्ला झाल्याचे समोर आले. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात नेले; मात्र उपचारापूर्वीच धिवार यांचा मृत्यू झाला, तर रत्नमाला धिवार यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना त्यांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी मृत दाम्पत्याच्या मुलांनी दिलेल्या फिर्यादीवरून सासवड पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी तपास पथकाला मार्गदर्शन केले. गुन्ह्याची कार्यपद्धती, घटनास्थळ, माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक शंकर राऊत व अंमलदार यांनी दोन स्वतंत्र तपास पथके तयार केली. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.
संशयित आरोपी सातारा महामार्गाच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. पुणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने राजगड हद्दीत नाकाबंदी केली. संशयित आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीला सासवड न्यायालयामध्ये हजर केले असता (दि.30) पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शंकर राऊत, वैभव सोनवणे, राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव, तुकाराम राठोड, सायबर सेलचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोस्वामी, सासवड पोलिसांनी ही कामगिरी केली.
झोपडपट्टीतील सराईत
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फिर्यादी आणि साक्षीदारांकडे चौकशी करून संशयित आरोपीची माहिती मिळवली. गणेश सुभाष धिवार हा संशयित आरोपी पूर्वी येवलेवाडी परिसरातील लक्ष्मीनगर झोपडपट्टीतील भिमज्योत मित्रमंडळ परिसरात राहत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली.




