Doppler Radar : जानेवारीच्या अखेरीस सुरु होणार डाॅप्लर रडार; कर्नाटकातील मंगळुरूमध्ये सुरु आहे इन्स्टाॅलेशन

मंगळुरू : कर्नाटकात बसवण्यात येत असलेल्या डॉपलर वेदर रडारबाबत हवामान खात्याकडून मोठा अपडेट समोर आला आहे. कर्नाटकचे पहिले ‘सी बँड’ डॉपलर वेदर रडार मंगळुरूमध्ये 15 जानेवारीपर्यंत पूर्ण होणार होते, परंतु काही तांत्रिक समस्यांमुळे त्यास विलंब होत आहे, असे भारतीय हवामान विभागाच्या बेंगळुरू केंद्राचे प्रमुख एन पुविरासन यांनी सांगितले. आयएमडीच्या 150 वर्षांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यशाळेत पुविरासन बोलत होते.
पुविरासन म्हणाले की, आम्हाला आशा आहे की या महिन्याच्या अखेरीस डॉपलर वेदर रडार आपले काम सुरू करेल. आवश्यक जमीन उपलब्ध न झाल्यामुळे आयएमडीला येथे ‘एस-बँड’ डीडब्ल्यूआर स्थापन करण्यात अडचणी आल्या होत्या. टॉवर आणि त्याच्या सामानासाठी खोली तयार करण्यासाठी आम्हाला योग्य जागा हवी आहे.
सुरुवातीला आयएमडीने नंदी हिल्समध्ये रडार स्थापित करण्याची योजना आखली होती, परंतु, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांच्या विनंतीवरून, बेंगळुरूमध्ये योग्य जागेचा शोध सुरू करण्यात आला आहे. एस-बँड रडार 400 किलोमीटरची कव्हरेज श्रेणी प्रदान करते, तर सी-बँड आणि एक्स-बँडची श्रेणी अनुक्रमे 250 किलोमीटर आणि 100 किलोमीटर आहे.
डॉपलर हवामान रडार म्हणजे काय?
डॉपलर वेदर रडार हे एक विशेष रडार आहे, जे एकमेकांपासून काही अंतरावर असलेल्या वस्तूंच्या वेगाशी संबंधित डेटा गोळा करण्यासाठी डॉप्लर प्रभाव वापरते. हे इन्स्ट्रुमेंट मायक्रोवेव्ह प्रदेशात इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींचा वापर करून स्थान (श्रेणी आणि दिशा), उंची, तीव्रता आणि हालचाल आणि स्थिर वस्तूंची गती निर्धारित करते. हवेत तरंगणारे सूक्ष्म पाण्याचे थेंब ओळखण्यासोबतच त्यांची दिशा ओळखण्यासही ते सक्षम आहे.
डॉप्लर रडारच्या मदतीने हवामान विभाग 400 किलोमीटरपर्यंतच्या परिसरात हवामानातील बदल अचूकपणे ओळखू शकतो. या रडारमध्ये पॅराबॉलिक डिश अँटेना आणि फोम सँडविच गोलाकार रेडोम वापरला जातो. डॉपलर तत्त्वावर काम करणारे हे रडार दर मिनिटाला थेंबांचा आकार आणि त्यांच्या गतीशी संबंधित माहिती अपडेट करते.





