ताथवडे महापालिकेत नको, पुन्हा ग्रामपंचायत करा – भुजबळ

पिंपरी -ताथवडे आणि पुनावळे गाव 1997 साली महापालिकेत समाविष्ट झाले आहे. ही गावे महापालिकेत समाविष्ट होऊन 25 वर्षे झाली. आम्ही आजही पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सुविधांसाठी झगडतोय. महापालिका आमचे मूलभूत प्रश्न सोडवू शकत नाही. त्यामुळे ताथवडेत पुन्हा ग्रामपंचायत करा, अशी मागणी शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन भुजबळ यांनी केली आहे.
दै. प्रभातच्या पिंपरी-चिंचवडच्या विभागीय कार्यालयामध्ये श्रीं ची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. गणरायाच्या आरतीसाठी आणि दर्शनासाठी चेतन भुजबळ आले होते. त्यावेळी भुजबळ यांनी डिजिटल प्रभातशी संवाद साधला. याप्रसंगी चेतन पवार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
महापालिकेत ताथवडे आणि पुनावळे गावांचा समावेश करून काहीच विकास झालेला नाही. त्यामुळे ग्रामपंचायत केल्यास आम्ही ग्रामपंचायत निधीतून विकास कामे तरी करू शकू, असे भुजबळ म्हणाले. हिंजवडी आयटीनगरीच्या जवळ असलेले गाव म्हणून ताथवडे गावात सातत्याने गृहप्रकल्प वाढत आहेत. बांधकाम व्यावसायिक, नागरिक टॅक्स देतात. मात्र, विकासासाठी निधी देत नाही. पुनावळे गावातून संपूर्ण शहराला पाणी पुरवठा होतो. मात्र, ऐन उन्हाळ्यात पुनावळे गावात पाण्याची वाणवा असते. या भागातील अनेक सोसायट्यांना टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागतो, हे दुर्दैव आहे. आपण श्रीमंत महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या गप्पा करतो. परंतु, नागरिकांना पाणी देऊ शकत नाही , ही शोकांतिका आहे.





