पुणे जिल्हा | शेलपिंपळगाव-आळंदी प्रवास नका रे बाबा

शेलपिंपळगाव, (वार्ताहर) – शेलपिंपळगाव आळंदी रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे खड्ड्यात रस्ता की रस्त्यावर खड्डा अशी काहीशी परिस्थिती या रस्त्यावर झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना खड्ड्यांमुळे छोटे-मोठे अपघात घडत आहे. गेले कित्येक दिवसांपासून पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक प्रवाशांना आणि दुचाकीचालकांना मोठी दुखापतही झाली आहे.
तरीही हे खड्डे बुजविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला जाग येत नाहीये. या खड्ड्यांमुळे फक्त अपघातात होत नाहीये तर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. शेलगाव ग्रामपंचायतच्या हद्दीतील शेलपिंपळगाव-आळंदी रस्त्यावरील हॉटेल नानाश्री शेजारी असणार्या ओढ्यावरील पुलावर खड्ड्यांची अक्षरशा चाळण झाली आहे.
हे खड्डे बुजविण्यासाठी ग्रामपंचायत शेलगाव यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळोवेळी पत्र पुरवठा केलाय; मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्या पत्राला केराची टोपली दाखवली जात आहे. पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या मार्गांपैकी एक मार्ग म्हणजे हा रस्ता जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि मराठवाडा विदर्भातील भाविक श्रीक्षेत्र आळंदीमध्ये माऊलींच्या दर्शनासाठी येताना याच रस्त्याचा वापर करत असतात.
तर उत्तर पुणे जिल्ह्यातील शेतकरी आपल्या शेतातील शेतीमाल याच रस्त्यावरून पुढे पुणे शहरात विक्रीसाठी नेत असतो; मात्र याच रस्त्याची शेलपिंपळगाव, शेलगांव, वडगाव घेणंद, चर्होली खुर्द या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने वाहन चालकांना रस्त्यावरून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे सुधीर मुंगसे,
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विशाल झरेकर, खरेदी-विक्री संघाचे संचालक संतोष आवटे, सरपंच विकास भिवरे, सरपंच शशिकला घेणंद, उद्योजक जयसिंग गरुड, मंगेश आल्हाट, चेअरमन रविराज झरेकर, मनसे नेते तुषार बवले यांच्यासह स्थानिक नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी गांधीगिरी मार्गाने रस्ता बंद करण्याचा इशाराच प्रशासनाला दिला आहे..
शेलपिंपळगाव-आळंदी रस्त्यावरील ग्रामपंचायत शेलगाव हद्दीतील नानाश्री हॉटेल समोर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्यांविषयी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले आहे तरीही अधिकार्यांना जाग येणार नसेल तर गांधीगिरी मार्गाने आंदोलन करण्यात येईल. -वैशाली आवटे, सरपंच शेलगांव





